कसब्यानंतर आता महापालिकेत मविआ पॅटर्न?

कसब्यानंतर आता महापालिकेत मविआ पॅटर्न?
Published on
Updated on

पांडुरंग सांडभोर

पुणे : कसबा पेठेतील दणदणीत विजयानंतर आता ही महाविकास आघाडी महापालिका निवडणुकीतही अशीच कायम राहिल्यास भाजपला तब्बल 50 हून अधिक जागांवर फटका बसू शकतो. गत महापालिका निवडणुकीतील या तिन्ही पक्षांची प्रभागनिहाय मतांची बेरीज केल्यानंतर हा निष्कर्ष निघत आहे. त्यामुळे भाजपसाठी ही महाविकास आघाडी कडवे आव्हान ठरणार आहे. याशिवाय, आघाडीतील स्वबळाचा नाराही बंद होणार असल्याचे स्पष्ट आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांची एकत्रित महाविकास आघाडी आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतरही हे तीनही पक्ष एकत्र आहेत. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक या तीनही पक्षांनी एकत्र येऊन लढविली आणि जिंकली. त्याचा परिणाम आगामी पालिका निवडणुकांवर होणार आहे.

2017 च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची जवळपास पन्नास ते साठ जागांवर आघाडी होती. उर्वरित शंभर जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. तर भाजप व शिवसेनेने मात्र स्वतंत्र निवडणूक लढविली. दरम्यान, या तिन्ही पक्षांतील मतविभाजनाचा मोठा फायदा भाजपला झाला होता. आता या निवडणुकीतील प्रभागनिहाय मतांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास भाजपला मिळालेल्या 98 जागांपैकी 51 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मतांची बेरीज अधिक होत आहे.

त्यामुळे आघाडी एकत्र येऊन पालिका निवडणुकीला सामोरे गेल्यास भाजपला या 51 जागांवर थेट धक्का बसू शकतो. विशेष म्हणजे, यामधील केवळ पाच ठिकाणीच तीन पक्षांची मते भाजपपेक्षा जास्त आहेत, तर उर्वरित 46 जागा केवळ दोनच पक्षांच्या मतांची बेरीज भाजपपेक्षाही अधिक आहे. त्यात काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, तर काही जागांवर राष्ट्रवादी-शिवसेना, तर काही ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मतांची बेरीज अधिक आहे. शिवसेनेत फूट पडली असली, तरी केवळ एक नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक ठाकरे यांच्यासमवेत आहेत.

त्यामुळे भाजप-सेना युतीचा या आकडेवारीवर फारसा परिणाम करणारा नसल्याचे दिसून येते. दरम्यान, गत पालिका निवडणुकीच्या तुलनेत आगामी महापालिका निवडणुकीची प्रभागरचना, आरक्षण, उमेदवार यात बदल असणार आहे. मात्र, तरीही गत पालिका निवडणुकीत भाजपची लाट असतानाही असे चित्र असेल, तर महाविकास आघाडीची मोट अशीच कायम राहिल्यास भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

मविआच्या मतांची टक्केवारी जास्तच
सर्वाधिक 98 जागा जिंकणार्‍या भाजपला 2017 च्या निवडणुकीत 37 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस 23 टक्के, शिवसेना 14 टक्के, काँग्रेस 9 टक्के आणि मनसेला 6.44 टक्के मते होती. यात महाविकास आघाडीतील मतांच्या टक्केवारीची बेरीज केल्यास ती 46 टक्के इतकी होते. भाजपपेक्षा ही टक्केवारी 9 टक्के इतकी अधिक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news