पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर जगातील काही नामांकित ब्रँड्सना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यांना आपली शाही प्रतिष्ठा गमावण्याचा धोका आहे. राणी एलिझाबेथ यांचे जवळपास 600 आवडते ब्रँड होते, जे त्यांच्या निधनानंतर आपली शाही ओळख गमावू शकतात. आता या ब्रँड्सचे 'शाही'पण केवळ एका व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II यांचे निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. राणी एलिझाबेथ यांया मृत्यूनंतर, त्यांचे थोरले पुत्र, राजा चार्ल्स तृतीय हे ब्रिटनचे नवे सम्राट बनले. 19 सप्टेंबर रोजी राणी यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर सुमारे 600 ब्रँड्सना शाही दर्जा गमावण्याची भीती आहे. या ब्रँड्समध्ये कॅडबरी चॉकलेट, मेसन टी, बर्बेरी रेनकोट आणि अशा अनेक ब्रँड्सचा समावेश आहे जे राणीचे आवडते होते. या ब्रँड मालकांना आता भीती वाटत आहे की जर राजा चार्ल्सने त्यांना मान्यता दिली नाही तर ते शाही दर्जा गमावतील, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. असे झाल्यास त्यांना शाही दर्जा तर गमवावा लागेलच, पण त्यांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागणार आहे.
आता या ब्रँडना त्यांचा शाही दर्जा टिकवून ठेवण्यासाठी राजा चार्ल्स III च्या मंजुरीची वाट पाहावी लागणार आहे. फोर्टनम, मेसन टी, बर्बेरी रेनकोट, कॅडबरी चॉकलेट, ब्रूमस्टिक आणि डॉग फूड मेकर्ससह 600 ब्रँड्सना ब्रिटनचे नवे किंग चार्ल्स तृतीय यांची मान्यता न मिळाल्यास शाही दर्जा काढून टाकण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी असेल. तथापि, किंग चार्ल्स तिसरे यांनी अद्याप या ब्रँड्सवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. याआधी, चार्ल्स यांनी प्रिन्स म्हणून 150 हून अधिक ब्रँड्सना स्वतःचा शाही दर्जा जारी केला होता. ब्रँडचा शाही दर्जा ते सर्वोत्तम असल्याचे दर्शवितात. त्यांना शाही शिक्का देण्यात आला आहे. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. रॉयल वॉरंट होल्डर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हक्कधारकांना त्यांची उत्पादने, पॅकेजिंग, स्टेशनरी, जाहिराती, परिसर आणि वाहनांवर शाही दर्जा लावण्याचा अधिकार आहे. काही कंपन्यांसाठी शाही समर्थन ही एक शक्तिशाली विक्री युक्ती आहे. ज्याचा कंपच्या उत्पादन विक्रीवर मोठा प्रभाव पडतो.