अफगाणिस्तानचा कांदा अमृतसरच्या बाजारात!

Onion www
Onion www

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  अफगाणिस्तानचा कांदा भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील वाघा बॉर्डरवरून थेट पंजाबमधील अमृतसरच्या बाजारात दाखल झाला आहे. आयात केलेल्या तीन ट्रक म्हणजे सुमारे 60 टन गरवी कांद्याची आवक झाली असून, 22 ते 23 रुपये किलो या दराने अफगाणिस्तान कांद्याची अमृतसर बाजारात विक्री झाली आहे. कांद्याला आयात शुल्क नसल्यामुळे व्यापार्‍यांनी हा कांदा आयात केल्याचे सांगण्यात आले.

नाशिकच्या बाजारपेठेतून उत्तरेकडील राज्यांत जाणार्‍या कांद्याला अफगाणिस्तानच्या आयात कांद्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता असून, कांद्यावर आयात शुल्क त्वरित लागू करण्याची मागणी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्के वाढविल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा दर घटल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. आता अफगाणिस्तानचा कांदा पाकिस्तानमार्गे अमृतसरमध्ये आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत माहिती देताना कांद्याचे निर्यातदार प्रवीण रायसोनी म्हणाले की, कांद्यावर कोणतेही आयात शुल्क नाही. अफगाणिस्तानमध्ये कांद्याचे पीक जोरदार आलेले असून, तेथे किलोचा दर 10 रुपये आहे. वाहतूक खर्च 10 ते 11 रुपये असून, अमृतसर बाजारात या कांद्याची विक्री शुक्रवारी (दि. 25) 22 ते 23 रुपये दराने झाली. भारताने निर्यात शुल्क वाढविल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये गेले दोन दिवस कांद्याचे दर किलोस 14 रुपये झाले आहेत. अफगाणिस्तान कांद्याची प्रत महाराष्ट्रातील कांद्याच्या तुलनेत हलकी असून, चवीस तिखटपणा कमी राहतो. मात्र, तो कांदा अमृतसरच्या बाजारपेठेत सातत्याने आयात होत राहिल्यास महाराष्ट्रातील कांद्याला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

कारण, महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा आणि मध्य प्रदेशातील बाजारपेठेतून दररोज सुमारे 150 ट्रक कांदा हा पंजाब, दिल्ली, हरियाणा येथील बाजारात विक्री करून पाठविला जातो. तेथील खरेदीदारांना अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त मिळाल्यास महाराष्ट्रातील त्यांची खरेदी रोडावून स्थानिक बाजारात दर घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय केंद्र सरकारच्या नाफेडकडून साठवणुकीतील कांद्यापैकी गरवी कांद्याची दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू राज्यात सरासरी किलोस 18 ते 22 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तर, महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये गरवी कांद्याचा किलोचा सरासरी दर सध्या 20 ते 24 रुपये असल्याची माहितीही रायसोनी यांनी दिली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news