कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातलेल्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स व संलग्न कंपन्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाल्याने विविध कंपन्यांची अॅडमिन श्रुतिका वसंत सावेकर-परीट (वय 32, रा. गुरूप्रसाद हाईटस, नागाळा पार्क) हिला आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली.
संशयित महिलेला (आज) शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कमी काळात दामदुप्पट परतावा देण्याच्या बहाण्याने शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स तसेच संलग्न विविध कंपन्यांचा म्होरक्या व संशयित लोहितसिंग सुभेदारने संचालक, एजंटाच्या साखळीतून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यातील लाखांवर गुंतवणूकदारांना सुमारे तीन हजार कोटीचा गंडा घातल्याचे उघडकीला आले आहे.
सुभेदारसह 27 संचालकाविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पसार झाले आहेत. त्यापैकी 5 जणांना अटक झाली आहे. कंपनीच्या कारभारात अॅडमिन म्हणून जबाबदारी सांभाळणार्या श्रुतिका सावेकर- परीट हिचा सक्रिय सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने तिला सायंकाळी अटक करण्यात आल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक तथा तपासाधिकारी स्वाती गायकवाड यांनी सांगितले. श्रुतिका सावेकर-परीट हिच्यावरील कारवाईमुळे अटक झालेल्या संशयिताची संख्या सहा झाली आहे.