पुढारी ऑनलाईन : मॉडेल- अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनाच्या वृत्ताने शुक्रवारी खळबळ उडाली होती. ही माहिती तिच्या मॅनेजरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून दिली होती. पूनमला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (cervical cancer) झाल्याचे सांगण्यात आले होते. या वृत्ताने पूनम पांडेच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दुसरीकडे, पूनम पांडेच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर तिचे कुटुंबीय नॉट रिचेबल झाले होते. यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. याच दरम्यान, पूनम पांडेने 'मी जिवंत आहे' असे सांगितल्याने तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले आहे की ती जिवंत आहे आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हे केले गेले. या कॅन्सरने अनेक लोकांचा बळी घेतला आहे. (Poonam Pandey is alive)
पूनम पांडेने गर्भाशया मुखाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन निवडला. २ फेब्रुवारी रोजी तिचा कॅन्सरने मृत्यू झाल्याचे वृत्त पसरले होते. तर आता ३ फेब्रुवारीला पूनमची तब्येत बरी असल्याचा खुलासा झाला आहे. (poonam pandey instagram)
इंस्टाग्रामवर 'नशा' फेम अभिनेत्री पूनम पांडेने म्हटले, "तुम्हा सर्वांसोबत काहीतरी महत्त्वपूर्ण शेअर करणे मला भाग पडले – मी येथे आहे, जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मला झालेला नाही. परंतु दुर्दैवाने, हा आजार कसा टाळायचा? याबद्दल जागृती नसल्याने हजारो महिलांचा यामुळे बळी जात आहे. इतर काही कॅन्सरप्रमाणेच, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य म्हणजे HPV लस आणि लवकर तपासणी चाचण्या करणे. या आजारामुळे कोणाचाही जीव जाणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. गंभीर जनजागृतीने एकमेकांना सशक्त बनवूया आणि प्रत्येक स्त्रीला तो कसा टाळता येईल? याची माहिती दिली जाईल याची खात्री करूया. काय करता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी बायोमधील लिंकला भेट द्या. या आजाराच्या विनाशकारी प्रभावाचा अंत करण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया. #DeathToCervicalCancer (sic)."
पूनम पांडेचे शुक्रवारी निधन झाल्याचे वृत्त व्हायरल झाले होते. या वृत्ताची तिच्या मॅनेजरने पुष्टी केली होती. तिच्या टीमने इन्स्टाग्रामवर अधिकृत घोषणेद्वारे याची माहिती दिली होती. "आजची सकाळ आमच्यासाठी अवघड आहे. तुम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमची लाडकी पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे गमावले आहे. तिच्या जीवनात निखळ प्रेम आणि दयाळू माणसे भेटली. या दुःखाच्या काळात, आम्हाला गोपनीयता हवी आहे." असे निवेदनात म्हटले होते. (poonam pandey death news)
पूनम पांडे केवळ मनोरंजन विश्वातील तिच्या कामासाठीच नव्हे तर वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहिली आहे. (Poonam Pandey is alive)
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 'ह्युमन पेपिलोमा' नावाच्या विषाणूमुळे होतो. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या काळात करणे कठीण असते. पण सुरुवातीच्या काळात उपचार झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर्व्हिक्स किंवा ग्रीवा म्हणजे काय? तर गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग होय. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस असलेल्या योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चे अनेक स्ट्रेन असतात. यातील काही स्ट्रेन घातक आहेत. याचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. पण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)चा संसर्ग झालेल्या प्रत्येकालाच कॅन्सर होतो, असे नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांना त्रास होण्याची शक्यता असते. नियमित तपासणी आणि पॅप स्मिअर चाचणी केल्याने हा आजार पुर्ण बरा होवू शकतो.
हे ही वाचा :