“…म्‍हणून तर तुला घेतला या रोलमध्‍ये” : अभिनेते किशोर कदम यांची ‘ती’ पोस्‍ट पुन्‍हा व्‍हायरल

“…म्‍हणून तर तुला घेतला या रोलमध्‍ये” : अभिनेते किशोर कदम यांची ‘ती’ पोस्‍ट पुन्‍हा व्‍हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे ६८ व्‍या राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कारांची घोषणा शुक्रवारी ( दि. २२) करण्‍यात आली. अवंछित आणि गोदाकाठ या चित्रपटांतील भूमिकांसाठी अभिनेते किशोर कदम यांना 'स्‍पेशल ज्‍युरी मेन्‍शन पुरस्‍कार जाहीर झाला आहे. या दोन्‍ही चित्रपटांची रसिकांमध्‍ये चर्चा आहेच. त्‍याचबरोबर गोदाकाठ चित्रपटातील चित्रीकरणावेळी आलेल्‍या अनुभवावरील किशोर कदम यांची जुनी फेसबुक पोस्‍टही व्‍हायरल होत आहे.

किशोर कदम यांची व्‍हायरल होणारी पोस्‍ट…

आमच्या गोदाकाठचा कॅमेरामन आणि वन ऑफ ध प्रोड्युसरने मला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचं ज्युरी अवॉर्ड मिळाल्याचं ऑन लाईन सर्टिफिकेट पाठवलं आणि त्याने एकही लाईट न वापरता अक्खा सिनेमा शूट केला होता हे पुन्हा एकदा आठवलं ..
चांगलं काम एकतर खूप पैसे असतांना होतं किंवा खूप पैसे नसतांना होतं .. असो ..
हेही कशावरून आठवलं … तर ..
मुसळधार पाऊस कोसळत होता..
आमचं जेमतेम आठ दहा जणांचं आक्ख युनिट पावसात तुडुंब भिजत होतं ..
माझी झोपडी पलीकडे आणि मध्ये गुडघा गुढघा वाढलेल्या तांदूळ लोम्ब्या … त्यांच्या खूप अलीकडे डांबरी रस्त्यावर आम्ही उभे .. सोरेनने झोपडीच्या दिशेने कॅमेरा लावलेला .. वाईड फ्रेम .. पाऊस कोसळतोच आहे … मला छत्रीखाली घेऊन गजा म्हणतो .." किश्या .. हे बघ तू तिथून जो पळत सुटलायस तो आता इथे घराजवळ पोहोचलायस .. या बाजूला…( तो डाव्या बाजूला बांधा सारख्या उंचवट्यावरली एक जेमतेम दहा इंची मातीची पायवाट दाखवतो ) या पायवाटेवरून तू झोपडीत जीव घेऊन पोहोचतोस .. तिचं किंचाळणं तुला ऐकू येतंय … दार ढकलून आत पोहोच आणि दार लावून घे .. इथे शॉट कट होईल .."
थंडी वाजते आहे .. कपडे निथळत अंगाला चिकटलेत .. शॉट लावलाय .. नाही म्हणण्याची सोय नाही .. रोल पाहिजे ना चांगला ? मग झेला हे .. ( मी मनात )
मी मागे जाऊन उभा राहातो .. हातात कंटिन्यूटीची छत्री .. मागल्या शॉटमध्ये पावसात पठारावरून धूम पळतांना चप्पल तुटलेली शूट झालेलं त्या मुळे पायात नो चपला .. साताठ जणांचं युनिट चार पाच छत्र्यांमध्ये आक्रसून उभं .. मला जवळ जवळ हजारभर पावलं पळत झोपडीत पोहोचयचय .. मी शॉटच्या आधी छत्री हातात ठेऊनच श्वास लागावा म्हणून उंच उड्या मारतोय .. मधेच एक वाहन थांबून हा बाबा भर पावसात छत्री घेऊ का उड्या मारतोय ते कुतूहलानं पाहातं .. युनिट मधलं कुणीतरी ओरडून त्यांना निघून जायला सांगतं .. त्यांना छत्रीखाली लपलेला कॅमेरा दिसत नाही .. एक माणूस वेड्यागत भर पावसात उड्या मारत रस्त्याच्या मधोमध आहे आणि ही गर्दी दूर उभं राहून हे फक्तं पहाते आहे याचं त्यांना आश्चर्य वाटतं ……
" साउंड … रोलिंग .. कॅमेरा … रोलिंग … ऍक्शन …" मला ऐकू येतं ..
मी जीव घेऊन पळू लागतो .. पळता पळता वाऱ्याने माझी छत्री उलटी होते .. पाऊस कोसळतच असतो ..गजा शॉट कट करेल असं वाटतं पण कट ऐकू येत नाही … मी भर पावसात छत्री सुल्टी करण्याचा प्रयत्न करतो … ती होत नाही …
( मी मनातल्या मनात गजाला शिव्या देतो )
.. आणि उलटी छत्री घेऊनच पुन्हा पळत सुटतो … मग त्या चिमण्यां पायवाटेवर येतो .. अमूलमस्क्यासारखी माती घसरत असते .. कसाबसा तोल सावरत मी त्या बांधावरून पळत राहातो … मला फक्त झोपडी दिसत असते .. मी पळत राहातो … आणि …मध्येच ती चिमणी पायवाट संपते .. पुढे घनदाट झाडी असते .. उजव्या बाजूला कमरेइतकं गवत असतं .. पाऊसही जीव घेऊन कोसळतच असतो ….वाटतं आतातरी गजा शॉट कट म्हणेल .. कसलाच आवाज येत नाही ..
पाऊस अगडबंब कोसळतच असतो ..
( कम्प्लिट ध ऍक्शन … ऍक्शन कम्प्लिट करो .. युज युअर इन्स्टिन्क्ट .. रुको मत … भागो xxxxx .. भागो कम्प्लिट ध ऍक्शन ..) क्षणार्धात वीज चमकावी तसे दुबेजी आठवतात ..
मी बेदिक्कत कमरे इतक्या गवतात उडी मारतो .. पायात खडे, चिखल, काटेकुटे शिरतात .. वेदना जाणवण्या पेक्षा झोपडीतून येणाऱ्या किंकाळ्या मला चिखलात रुतलेले पाय महत्प्रयासाने उचलायला भाग पाडतात .. मी कसाबसा त्या तुडुंब पावसात झोपडी पर्यंत पोहोचतो .. दार उघडून धाडकन लावून घेतो ..
" कट " गजाचा ओरडणारा आवाज ऐकू येतो ..
खूप दम लागलेला असतांना मी आतून खोलीतून ओरडतच बाहेर येतो ..
" xxxxx .. ती पायवाट कुणी पहिली होती का कुठवर आहे ती .. असिस्टंट काय xx xxxx का त्यांची .. xxx हे बघायला नको आधी ?.. मधेच शेतात उतरावं लागणार हे कोण सांगणार तुमचा बाप ? .. xxx एँक्टर कोऑपरेट करतोय म्हणजे तुम्ही जीव घेणार का त्याचा .. ? गजा .. xxxxx हे काये यार .. पायात काटे घुसलेत xxx .. चालता येत नाहीये .. हे बघ काय झालंय .. "
हे सगळं तोवर सगळं युनिट आणि तो धावत ( वेगळ्या वाटेने )तिथे पोहोचलंय आणि स्तब्ध होऊन ऐकतंय .. गजा माझ्या जवळ येतो .. मी रडवेला होत ओरडतो ..
"काय यार गजा .. xxx तुला बघता येत नाही का आधी ती पायवाट कुठे संपते .. मी कसा पोहोचणार या झोपडी पर्यंत .. " वगैरे वगैरे ..
गजा शांतपणे माझा राग उसळू देतो .. मग स्वतःच्या छत्रीत मला ओढून घेत म्हणतो
" xxxxx म्हणून तर घेतलाय तुला या रोल मध्ये .. मराठीतला कोणता नट हा शॉट असा देऊ शकला असता सांग ?"
( हा साला त्याच्या सिनेमात काम करणाऱ्या प्रत्येक नटाला असाच बोलत असणार ! )
मी त्या कडे नुसता पाहात राहातो ..
या माणसाने आयुष्यभर माझ्याशी हाच खेळ खेळलाय .. मी काय बिघडवलय याचं या आयुष्यात काय ठाऊक !
त्या दिवशी सगळं शूट संपतं .. रात्री आम्ही माझ्याच रूममध्ये रॅपप पार्टी करतो .. पहाटे निघतो ..
पाऊस पडतच असतो तुडुंब ..
आम्ही मुंबईत पोहोचतो ..
आणि रात्री बातम्यात..
आक्खं त्र्यंबकेश्वर गुडघ्या एवढ्या पाण्यात बुडून गेल्याचं कळतं …
नशीब माझं ..
गजाने त्यातही स्वतः बुडत मलाही कुठल्या कुठल्या गल्ल्यांतून मुसळधार पावसात पळवलं असतं ..
हे सुचून अंगावर काटा येतो ..
पण तरी वाटतं
एक दिवस
अजून एक दिवस ……थांबायला हवं होतं ..

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news