दादांची राष्ट्रवादी सायबांच्या ‘लायनीत’

दादांची राष्ट्रवादी सायबांच्या ‘लायनीत’
Published on
Updated on

सातारा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार गटात डेरेदाखल झालेल्या आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांनी सोशल मीडियावर 'साहेब शुभेच्छांचा स्वीकार करावा,' असा संदेश पाठवत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे अजितदादा पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागपुरात 'लायनीत' उभे राहून शरद पवारांना भेटून शुभेच्छा दिल्या. जुने सर्व कार्यकर्ते समोर पाहून पवारांनाही गुदगुल्या झाल्या. भाजपचे राज्यसभेचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनीही टायमिंग शॉट मारत शरद पवार यांना सोशल मीडियावर दिलेल्या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे. सातारा जिल्ह्यात अजितदादा गटाकडून शरद पवार प्रेमाचा उमाळा दिसल्याने राजकीय कुतुहलात वाढ झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन गटात विभागणी झाल्याने सर्वात मोठी गोची पवार कुटुंबावर प्रेम करणार्‍या सातारा जिल्ह्याची झाली आहे. एकीकडे राजकीय महत्वकांक्षा तर दुसरीकडे शरद पवारांवरील आतोनात प्रेम या कात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या आहेत. अजितदादा पवार गटात दाखल होवूनही विधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांचे शरद पवारांवरील प्रेम अजिबात आटलेले नाही. रामराजे जाहीर भाषणात 'मी शरद पवारांमुळेच सर्व काही करु शकलो,' असे बोलत असतात. मकरंदआबा पाटील तर प्रत्यक्ष शरद पवारांना दिवाळीत जावून भेटूनही आले. 'तुमचे मिटवा, आम्हाला त्रास होतोय,' असा आग्रहही शरद पवारांकडे मकरंदआबांनी धरला. त्यावर 'बाकी सगळे मान्य होईल, भाजपसोबत जाणे मान्य नाही,' असे शरद पवारांनी त्यांना जाहीरपणे सांगून टाकले. त्यानंतर सातार्‍याच्या दौर्‍यावर आलेल्या शरद पवार यांनी दुसर्‍या गटात गेलेल्या कोणत्याही नेत्यांवर कडवट टीका केली
नाही. अनेक प्रश्नांना त्यांनी बगल देत 'तुम्ही त्यांनाच विचारा,' असा सूर आळवला. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावरही त्यांनी मिश्कील भाष्य केले. एकप्रकारे शरद पवार यांनी चर्चेचे व परत फिरण्याचे सर्व दरवाजे उघडे ठेवले.

शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. हेच निमित्त साधून आ. मकरंद पाटील यांना मानणार्‍या समर्थकांनी नागपुरात शरद पवार यांची थेट भेट घेतली. शरद पवार आणि ते एकाच हॉटेलात होते म्हणे! जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील, माजी आ. प्रभाकर घार्गे, बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे यांचा त्यात समावेश होता. या सर्वांना समोर पाहून पवारांना गुदगुल्या झाल्या. त्यांच्या चेहर्‍यावर छदमी हास्य उमटले. अजितदादा पवारांच्या गटात गेलेल्या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनीही शरद पवार यांच्यावरचे प्रेम वाढदिवशी दाखवले. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण मात्र श्रध्दास्थाने अशी जपायची असतात, असाही संदेश खिलाडूवृत्तीच्या सातारा जिल्ह्याने यानिमित्ताने दिला.

लोकसभेसाठी भाजप सातारा जिल्ह्यात जोरदार फिल्डींग लावून आहे. सद्यस्थितीत राज्यसभेचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हेच लोकसभेचे प्रबळ दावेदार उमेदवार मानले जातात. मात्र सध्या सोशल मिडीयावर ओकार्‍या काढणार्‍या बेडूकरावांची संख्या वाढत आहे. अशा अनेक 'बोल्ट्यांनी' भाजप उदयनराजेंना तिकीट देणार नसल्याची पोपटपंची चालवली आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असताना भाजप छत्रपतींच्या वंशजाला राजधानी सातार्‍यात बाजूला ठेवण्याचे धाडस करेल का? अशी चर्चा सातार्‍यात आहे. असे असले तरीही उदयनराजे टायमिंग शॉटमध्ये माहीर आहेत. ते सावध आहेत. त्यांनी आठवणीने शरद पवार यांच्या वाढदिवशी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यातून उदयनराजे यांनी पवारांविषयी प्रेम दाखवले आहेच. त्याशिवाय पवारांनी जर उदयनराजेंसाठी दार उघडे ठेवले असेल तर उदयनराजेही वेळ आली तर त्या दाराच्या दिशेने प्रवास करु शकतील, असा संदेश सोशल मिडीयातून दिला आहे.

रामराजेंचे स्टेटस : शुभेच्छांचा स्वीकार करा !

शरद पवार यांचा वाढदिवस काल 12 डिसेंबर रोजी झाला. शरद पवार यांच्या गटातून अजितदादांच्या गटात गेलेल्या आ. रामराजे नाईक-निंबाळकर व आ. मकरंद पाटील यांनी सोशल मीडियावर शरद पवार यांच्यासमवेत आपला फोटो ठेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रामराजे यांनी स्वत:च्या मोबाईलवर स्टेटस ठेवत 'साहेब शुभेच्छांचा स्वीकार करा,' अशी आर्जवच केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news