Acidity : अ‍ॅसिडिटीवर उपाय करताना

Acidity
Acidity
Published on
Updated on
  • डॉ. प्राजक्ता पाटील

सर्वसाधारणपणे दाह आणि पित्त असे त्रास प्रामुख्याने उन्हाळ्यात होतात. पित्ताची लक्षणं म्हणजे जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं छातीत जळजळ, मुख दुर्गंधी, तोंड येणं आणि दाह ही होय. शरीरात शरीर सर्वाधिक पातळीवर आम्लनिर्मिती करतं. अन्न हे तुमचं औषध ठरु शकतं, म्हणूनच आपण काय खातोय याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या आरोग्यास हितकारक अशा अन्नाचा समावेश असलेला आहार आखला पाहिजे.

आपल्या अन्ननलिकेच्या बरोबर खाली जिथे स्टमक ( जठर ) असते त्याच्या आतील पेशी या हायड्रोक्लोरिक अॅसिडची निर्मिती करीत असतात. ही पचनक्रियेतील अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे. याच अॅसिडचा उपयोग आपल्या अन्नपचनासाठी केला जातो; परंतु अनेकदा आपले स्टमक हे जरुरीपेक्षा जास्त अँसिडची निर्मिती करू लागते, ज्यामुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवते.

अ‍ॅसिडिटीची लक्षणे  १) छातीत जळजळणे २) पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे. ३) मळमळणे, उलटी होणे. ४) घशाला कोरड पडणे. ५) जेवणाची चव न लागणे. ६) आंबट ढेकर येणे. ७) पोट जड होणे आणि अपचन होणे. ८) अस्वस्थ होणे आणि श्वास घेताना त्रास होणे.

अ‍ॅसिडिटीची कारणे : १) नाश्ता न करता बराच काळ पोट रिकामे राहणे किंवा खूप खाणे. २) तांदूळ, तेल, तूप, मैदा आणि मसाल्यांचे अधिक प्रमाणात सेवन करणे. ३) जास्त मानसिक ताणतणाव आणि राग यामुळेही आतड्यांमधे अँसिडची निर्मिती जास्त प्रमाणात होते. ४) चहा, कॉफी, सिगारेट, अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन करणे. ५) जेवण व्यवस्थित चावून न खाल्यामुळे. ६) जेवणाच्या अनियमित वेळा आणि अपुरी झोप. ७) व्यायाम आणि शारीरिक हालचालींचा अभाव. ८) पेनकिलर गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन.

आजकाल शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांमध्ये अॅसिडिटीच्या तक्रारी दिसून येतात. परीक्षेच्या दिवसांत दिवस-रात्र जागरण करणे, टीव्ही, कॉम्प्युटरसमोर सतत बसून राहणे, मैदानी खेळ न खेळणे तसेच जंकफूडचे भरपूर प्रमाणात सेवन करणे यामुळे मुलांमध्ये अॅसिडिटीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. लहान मुलांना अॅसिडिटी होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावा. त्यामधे ताजी फळे आणि भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. रोज संध्याकाळी काही वेळ मुलांना मैदानात खेळायला सोडा. मुलांना जबरदस्तीने खूप खायला लावू नका. त्यांना जंकफूड शक्यतो देऊ नका किंवा आठवड्यातून फक्त एक दिवस द्या.

याखेरीज गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीरातील प्लासेंटेल हार्मोनचे सिक्रिशन वाढते. त्यामुळे लिव्हरच्या कार्याची गती मंदावते. जेवण पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे पोटात गॅस होऊ लागतो. प्रेग्नसीत शेवटच्या तीन महिन्यांत गर्भाशयाचा आकार खूप वाढतो. त्यामुळे त्याचा आतड्यांवर दाब पडतो. अशा वेळी न पचलेले अन्न परत वर येऊ लागते आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. हे लक्षात घेता प्रेग्नसीमधे एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा दर दोन तासांनी थोडं थोडं आणि चावून खावे. या काळात डॉक्टर अॅसिडिटी होऊ नये म्हणून औषधं देतात. त्याच औषधांचे सेवन करावे. मनाने अॅसिडिटीवर गोळ्या घेऊ नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज कोणतेही एक्सरसाईज करू नये.

सारांश, अॅसिडिटी ही कोणालाही होऊ शकते. परंतु, ती बराच काळ राहिली, तर त्यामुळे आतड्याचा पेप्टीक अल्सर होऊ शकतो. त्यामुळे अॅसिडिटी होऊ नये म्हणून संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news