नवी दिल्ली, वृत्तसंस्था : येत्या 30 सप्टेंबरपर्यंत आधार क्रमांक न दिल्यास पब्लिक प्रॉव्हिडंट फंडासह (पीपीएफ) अन्य अल्पबचत योजनांमधील ठेवी गोठविल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी अधिसूचना जारी करून पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत योजनांसह टपाल खात्यातील योजनांसाठी आधार आणि
पॅन कार्ड क्रमांकाची माहिती देणे अनिवार्य केले होते. या योजनेशी संबंधित ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. येत्या पंधरा दिवसांनी ही मुदत संपत आहे. टपाल खाते अथवा बँकांमध्ये आधार क्रमांकाची माहिती मुदतीत न दिल्यास संबंधितांच्या सरकारी योजनांतील गुंतवणूक गोठविली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
खाती गोठविल्यास टपाल खात्यातील ठेवी अथवा अल्पबचत योजनांवर व्याजाच्या स्वरूपात मिळणार्या सेवासुविधांवरही परिणाम होणार आहे. पारदर्शी व्यवहार आणि अवैध कृत्यांना चाप लावण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास आधार आणि पॅन लिंकिंग यापुढे अनिवार्य राहणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.