अबू आझमींचा वंदे मातरम् म्हणण्यास विरोध

अबू आझमींचा वंदे मातरम् म्हणण्यास विरोध
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  'वंदे मातरम् जेव्हा सभागृहात लावले जाते, तेव्हा मी उभा राहतो. मी वंदे मातरमचा आदर करतो; पण मी ते बोलू शकत नाही. कारण, आम्ही फक्त अल्लाहला मानतो…' समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींच्या या वक्तव्याचे विधानसभेत संतप्त पडसाद उमटले.

सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी यावेळी वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. या गदारोळात अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान, वंदे मातरम् हे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या संविधानानेच वंदे मातरम्ला राष्ट्रगानाचा दर्जा दिला आहे. जगातील कोणताच धर्म आपल्या मातेला प्रणाम करण्यापासून रोखत नाही, असे खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आझमी यांना सुनावले.

रामनवमीच्या दिवशी औरंगाबाद येथे रोशनगेट येथील राम मंदिरासमोर दोन धार्मिक समुदायांमध्ये वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला होता. त्यावेळी पोलिस गोळीबारात शेख नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात अबू आझमी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी बोलताना आझमी म्हणाले, ज्या व्यक्तीचा गोळीबारात मृत्यू झाला, त्याचा या तणावाशी काहीच संबंध नव्हता. ती व्यक्ती आपल्या घरात होती. तसेच या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणात मोर्चे झाले. त्यात त्यांनी 'इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', अशी घोषणा दिली. परंतु, ते आम्ही म्हणू शकत नाही. कारण, आम्ही फक्त अल्लाहला मानतो. आम्ही जगात कुणासमोरच मस्तक झुकवू शकत नाही. असे म्हणताच भाजपसह सत्ताधारी आमदार आक्रमक पवित्रा घेत वेलमध्ये आले आणि जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटे तहकूब केले.

कामकाज सुरू होताच आझमींच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला. वंदे मातरम्वर देशातील कोट्यवधी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अबू आझमी यांनी वंदे मातरम्बद्दल जे मत व्यक्त केले ते योग्य नाही. जगातील कोणताच धर्म आपल्या आईसमोर माथा झुकवू नका, असे म्हणत नाही. देशाच्या संविधानानेच वंदे मातरम्ला राष्ट्रगानाचा दर्जा दिला आहे. या सभागृहातही आपण वंदेमातरम् म्हणतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी सुनावले.

औरंगाबाद दंगलीबाबत स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, राम मंदिरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला आहे. तो आपल्यावर हल्ला करणार आहे, अशी अफवा पसरली होती. त्यात कोणतेही तथ्य नव्हते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news