गुलाब हे सर्व व्यापारी फुल पिकातील महत्त्वाचे पीक आहे. (Rose Farming) गुलाबामध्ये त्याच्या वाढीच्या सवयीनुसार हायब्रीड टी, फलोरिबंडा, मिनीएचर, वेली असे 4 प्रकार पडतात. यापैकी हायब्रीड टी या गुलाबाची लागवड शेतकरी, व्यापारी उत्पादनासाठी करतात. तर फलोरिबंडा, मिनीएचर व वेली या प्रकारच्या गुलाबांची लागवड बगीच्यामध्ये तसेच कुंड्यांमध्ये केली जाते.
गुलाबाच्या उत्तम वाढीसाठी कमीत कमी 6 तास प्रखर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. सवालीमध्ये गुलाबाचे झाड योग्यरीतीने वाढत नाही व त्यास फुलेदेखील येत नाहीत. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम काळी, लाल, हलकी जमीन गुलाबास जांगली मानवते. पाण्याचा निचरा न होणार्या जमिनीमध्ये मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाड मरते. गुलाबाची अभिवृद्धी डोळे भरून केली जाते. रोझा इंडिका अथवा रोझा मल्टिफ्लोरा या जातींच्या खुंटावर डोळे भरले जातात.
गुलाबाच्या यशस्वी लागवडीसाठी लागवडीपूर्वी तयारी फार महत्त्वाची असते. कारण जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर त्याच ठिकाणी 7 ते 8 वर्षे रोप राहते. जमिनीत 60×60×60 सें.मी. आकारमानाचे खड्डे 120 सें.मी.× 90 सें.मी. अंतरावर घ्यावेत, अथवा 45×45×45 सें.मी. आकारमानाचे चरप घ्यावेत. खड्डे अथवा चर खोदण्याचे काम मार्च अथवा एप्रिल महिन्यातच पूर्ण करावे. मे महिन्यामध्ये 50 टक्के पोयटा व 50 टक्के शेणखत यांच्या मिश्रणाने खड्डे अथवा चर भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यामध्ये 50 ग्रॅम फॉलिडॉल डस्ट मिसळून घ्यावी. तसेच 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम निंबोळी पेंड व 100 ग्रॅम स्टेरामिल मिसळावे व खड्डे/चर भरून घ्यावेत व लागवडीस तायर ठेवावेत. लागवडीपूर्वी खड्ड्यांना/चरांना भरपूर पाणी द्यावे. एक हेक्टर क्षेत्रामध्ये सुमारे 18,000 गुलाबांची कलमे लागतात. कुंड्यांमध्ये गुलाबाची लागवड करण्यापूर्वी शक्यतो मोठ्या आकाराची मातीची चांगली भाजलेली कुंडी निवडावी. त्यास तळाला 1 सें.मी. व्यासाचे छिद्र पाडावे. जेणेकरून पाण्याचा निचरा चांगला होईल. कुंडीच्या तळाशी छिद्रावर एक खापरीचा तुकडा पालथा झाकावा. त्याचे आजुबाजूला विटांचे तुकडे 2 ते 3 सें.मी. उंचीपर्यंत भरावेत. त्यावर वाळलेला पाळापाचोळा टाकावा. चांगले कुजलेले शेणखत 50 टक्के व पोयटा माती 50 टक्के यांचे मिश्रण करावे. त्यात 50 ग्रॅम फॉलिडॉल डस्ट मिसळावी. याच मिश्रणामध्ये 50 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 50 ग्रॅम निंबोळी पेंड व 50 ग्रॅम स्टेरामिल मिसळावे. या मिश्रणाने कुंडी भरावी. त्यास पाणी द्यावे.
गुलाबाची छाटणी (Rose Farming)जून व ऑक्टोबर महिन्यात करावी. उन्हाळ्यात छाटणी करू नये. पहिली छाटणी करताना झाडांची उंची 60 सें.मी. झाल्यानंतर करावी. अशक्त, फुटवे पूर्णपणे काढून टाकावेत. त्याचप्रमाणे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात हलकी छाटणी करावी. छाटणी करताना धारदार चाकूचा व सिकेटरचा वापर करावा व छाटणीनंतर बुरशीनाशकाची फवारणी करावी. गुलाबाच्या योग्य वाढीसाठी व भरपूर उत्पन्नासाठी नेहमी जमीन वापसा अवस्थेत ठेवावी. गुलाबाचे उत्पन्न सरासरी 2.5 ते 3.00 लाख फुले प्रतिहेक्टर इतके असू शकते. ग्लॅडिएटर, सुपरस्टार, मॉटेझूमा, पीस हॅपीनेस, आयफेल टॉवर, लॅडोरा, क्वीन एलिझाबेथ, अभिसारिका, एडवर्ड इत्यादी या गुलाबाच्या प्रमुख जाती आहेत.
– सत्यजित दुर्वेकर
हेही वाचा;