Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांनी आज (दि. ७) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. २०२४ मधील पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून चर्चांना पूर्णविराम दिला.

श्री विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो -सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आ. बबनराव शिंदे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय पाटील, आ. कैलास पाटील, आ.रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे आदीसह मान्यवर उपस्थित हेाते.
अभिजित पाटील यांच्या प्रवेशामुळे पंढरपुरात राष्ट्रवादी आणखी बळकट झाली आहे. त्यामुळे पंढरपुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी (Abhijeet Patil) असा सामना पहायला मिळणार आहे.

विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात देत अभिजित पाटील प्रकाश झोतात आले होते. साखर कारखाना क्षेत्रातील अभिजित पाटील हे एक मोठे नाव आहे. राज्यातील तब्बल पाच साखर कारखाने ते चालवत आहेत. राष्ट्रवादी नेत्यांबरोबरच त्यांची भाजपशीही देखील दोस्ती होती. त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे? असा प्रश्न विचारला जात होता. त्या प्रश्नाला राष्ट्रवादीत प्रवेश करत त्यांनी उत्तर दिले आहे.

दरम्यान, अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. पवार यांच्याशी त्यांचे असलेले संबंध यामुळे पंढरपूर विधानसभा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करुन उमेदवारी पक्की करुन घेण्याच्या दृष्टीनेही पाटील गटाने रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Abhijeet Patil  : शरद पवार यांनीच पंढरपुरातील परिस्थिती पाहत भाकरी फिरवली

खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच पंढरपुरातील परिस्थिती पाहत भाकरी फिरवली आहे. विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, व अभिजीत पाटील असे गट पडले आहे. सध्या अभिजीत पाटील गट स्ट्राँग आहे. जनाधार असलेल्या अभिजीत पाटील यांच्या खांद्यावर राष्ट्रवादीचे धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी २०२४ च्या विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून अभिजीत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी पाहत आहे. अभिजीत पाटील यांना पक्षप्रवेश देत व आगामी निवडणुकीची तयारी करण्याची सुचना देत काळे, भालके यांना शरद पवार यांनी एकप्रकारे धक्का दिला आहे. काळे, भालके आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news