कोल्हापूर ; गौरव डोंगरे : कोरोनानंतर ऑनलाईन व्यवहारांकडे ओढा वाढला आहे. अर्ज भरणे, बिल भरणा, मोबाईल रिचार्ज, खरेदीसह अनेक कामे घरबसल्या मोबाईलवरूनच होत आहेत. ही गरज ओळखून पोस्ट खात्यानेही अनेक घरपोच सेवांचा स्वीकार केला आहे. पोस्ट कार्यालयातील गर्दी टाळत आता पोस्टमन थेट घरी जाऊन बालकांची आधार कार्डे बनविणार आहेत. (Aadhaar card)
बँकिंग, वैद्यकीय, शैक्षणिक अशा महत्त्वाच्या कामांमध्ये आधार कार्ड अनिवार्य आहे. कोरोना काळात नवीन आधार कार्ड (Aadhaar card) बनविणार्यांवर मार्यादा आल्या होत्या. त्यात बालकांची आधार कार्डे बनविण्याचे काम धीम्या गतीने सुरू होते.
काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणारे हयातीचे दाखले घरबसल्या मिळतील याची व्यवस्था पोस्टाने करून दिली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापाठोपाठ आता जन्मलेल्या बालकांची आधार कार्डे बनविण्याची मोहीमही राबविण्यात येणार आहे.
घरातील बालकाला पोस्टाच्या कार्यालयात घेऊन जाणे, त्याठिकाणी असणारी गर्दी, लागणारा वेळ याची बचत करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार आहे. पोस्टमन घरी येऊन त्याच्या स्मार्ट फोनवर बालकाच्या जन्म दाखल्यावरील माहिती, आई-वडिलांच्या आधार क्रमांकाची माहिती भरणार आहे. बालकांच्या हातांच्या ठशांची आवश्यकता नसल्याने तत्काळ नोंदणी होऊन आधार क्रमांक मिळण्यास मदत होणार आहे.