इतिहासाने न सांगितलेली एक कहाणी : “रावलापाणी’

इतिहासाने न सांगितलेली एक कहाणी : “रावलापाणी’
Published on
Updated on

नंदुरबार :

जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड आदिवासी बांधवांचे नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले, भारतीय इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नव्हती. मात्र ब्रिटिशकालीन नोंदींमध्ये या घटनेच्या वस्तुनिष्ठ वर्णनांचे पुरावे आहेत. एवढेच नाही तर 'रावलापाणी' संग्रामस्थळी अंदाधुंद गोळीबाराच्या 'निशाण्या' तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात. या ठिकाणी स्मारक व्हावे ही कित्येक वर्षांपासूनची तेथील आदिवासी बांधवांची मागणी महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पूर्ण केली आहे. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी या स्थळाला पर्यटनाचा दर्जा देण्याचेही आश्वासन दिले आहे. आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने ही इतिहासाने न सांगितलेली कहाणी "रावलापाणी"

नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वीच्या अक्राणी महाल आणि सध्याच्या धडगाव तालुक्यातील 'रावलापाणी' येथे आदिवासी सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक आदिवासी शहीद झाले होते. २ मार्च १९४३ हाच तो दिवस. 'रावलापाणी' संग्रामस्थळी त्यावेळचे जंगल नष्ट झाले असले तरी अंदाधुंद गोळीबाराच्या 'निशाण्या' तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात. शहाद्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कांतीलाल टाटिया यांनी या घटनेचे पुरावे गोळा करून शासनाला सादर केले आहेत. त्यांनी रावलापाणीच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे.

१९३० नंतरच्या काळात स्वत: आदिवासी समुदायाचे असलेले संत गुला महाराज यांनी समाजबांधवांसाठी उभी केलेली आत्मसन्मानाची चळवळ बाळसे धरू लागली होती. अशातच १९३७ च्या फैजपूर काँग्रेसला उपस्थिती देण्याच्या काँग्रेसजनांच्या प्रयत्नाला यश आले व संत गुला महाराज स्वत: अधिवेशनासाठी मोरवडहून पायी गेले. मात्र, प्रस्थापितांच्या वर्चस्वामुळे संत गुला महाराजांना काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस चळवळींकडे न वळता 'आपधर्म' चळवळ मोठी करण्याच्या कार्यात त्यांनी वाहून घेतले. त्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ बंधू रामदास महाराज या चळवळीचे अध्वर्यू ठरले. चळवळीचा ओघ आटत नाही हे पाहून इंग्रजांनी नोव्हेंबर १९४१ मध्ये आरती चळवळीवर बंदी घातली. ४ मे १९४२ रोजी हद्दपार करण्याचा हुकूम तत्कालीन ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर बजावला. हद्दपारीत रामदास महाराज मोरवडहून राजघाट (चिखलदरा) येथे आपले कुटुंब व अनुयायांसह गेले. याच काळात देशात 'चले जाव' चळवळ जोरात होती. तत्कालीन धुळे जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी रामदास महाराजांना पत्र लिहून हद्दपारीची मुदत संपण्याची वाट न पाहता साम्राज्यवाद्यांच्या विरोधातील संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले. नानासाहेब ठकार स्वत: रामदास महाराजांना विनंती करण्यास राजघाटला गेले. या सर्वांचा परिपाक म्हणून रामदास महाराज नर्मदा नदी पार करून जिल्ह्यात परत यावयास निघाले. रस्त्यात त्यांच्याबरोबर बघता बघता हजारो आदिवासींचा 'कारवा' तयार झाला. १ मार्च १९४३ ला 'अक्राणी महल' या किल्ल्यावरून निघालेला हा 'कारवा' रावलापाणीजवळच्या निझरा नाल्यात पोहोचला. मोठमोठी झाडे, कीर्द जंगल, खोल नाला, दोन्ही बाजूला मोठ्या टेकड्या, किनार्‍यावरच मोठे बोरीचे झाड, १५००-२००० लोक थांबतील असा नाल्यातील सपाट भाग अशा स्थितीत मुक्कामासाठी स्त्री-पुरुष तेथे स्थिरावले. त्यांच्या आगमनावेळी 'बोरद' गाव लुटले जाईल, अशी खोटी अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे १ मार्च १९४३ ला 'बन' या गावी इंग्रज सैनिकांची पलटण पोहोचली. सैनिकांनी रात्रीतून पायी जाऊन रामदास महाराजांच्या 'कारव्या'ला नाल्याच्या दोन्ही बाजूने घेरत नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार केला गेला. १५ जणांना जागेवरच हौतात्म्य मिळाले व २८ जखमी झाले. प्राचार्य जी. बी. शहा यांच्या 'धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान' या पुस्तकात हे नमूद आहे. डॉ. जी. बी. शहांनी या हत्याकांडाची जनरल डायरने केलेल्या जालियनवाला हत्याकांडाशी तुलना केली आहे. क्रूर इंग्रजी प्रशासनाने केलेल्या बेछूट गोळीबाराच्या 'निशाण्या' दगडातील गोळ्यांच्या खुणांच्या रुपाने जिवंत आहेत. आजही २ मार्चला दरवर्षी मोरवडचे आपधर्मी न चुकता रावलापाणीच्या संग्रामस्थळी जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. प्रशासनाच्या वतीने रावलापाणीला हुतात्मा स्मारक म्हणून दर्जा मिळण्यासाठी केलेल्या हालचाली म्हणजे २५ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या नंदुरबार जिल्ह्याला शासनाने दिलेली नवीन ऐतिहासिक ओळख ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news