अवकाशातील शक्तिप्रदर्शन

अवकाशातील शक्तिप्रदर्शन

Published on

स्टार वॉर ही जुनी कल्पना आहे; मात्र त्याद़ृष्टीने होणार्‍या प्रयत्नांच्या बातम्या नेहमीच येत राहतात. रशिया आणि अमेरिका यांच्यात 1960-70 च्या दशाकांत अवकाश विज्ञानाच्या आघाडीवर स्पर्धा सुरू झाली आणि या स्पर्धेत मानव हा चंद्रावर पाऊल टाकण्यात यशस्वी ठरला. आता स्पर्धा संपली आणि अवकाश विज्ञान हळूहळू उपग्रहांपर्यंत मर्यादित होत गेले. प्रत्यक्षात अवकाशात शक्तिप्रदर्शन करण्याची स्पर्धा अजूनही संपलेली नाही. या दिशेने सध्याच्या बातम्या चिंताजनक आहेत.

चीनचा अवकाश कार्यक्रम हा लष्करी योजनांचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकी अवकाश संशोधन केंद्र नासाच्या प्रमुखाने दिलेल्या इशार्‍यानुसार चीन आपला सामरिक उद्देश लपविण्यासाठी बहुउद्देशीय अवकाश कार्यक्रमाचा वापर करत आहे. अशावेळी अमेरिकेने सजग राहणे गरजेचे आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी कॅपिटॉल हिल येथे खासदारांना चीनच्या अवकाश कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. गेल्या दहा वर्षांत चीनने लक्षणीय प्रगती केली असून, त्याचा उद्देश अजूनही गुप्त आहे, असे म्हटले जात आहे. एकुणातच चीनसंदर्भात अमेरिकेला महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे दिसते. त्यामुळेच नासाने अजूनही अवकाशात स्पर्धा सुरू आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

चीनवरील अमेरिकेचा असणारा अविश्वास हा आश्चर्यकारक वाटणारा नाही. चीन हा कोणतीही योजना युद्धपातळीवर तयार करतो आणि लागू करतो. मग खेळ असो, उत्पादन असो किंवा तंत्रज्ञान असो, तो प्रत्येक प्रयत्न हा सामरिक हेतूनेच करत असतो. वास्तविक अमेरिकेनेदेखील दीर्घकाळापर्यंत याच रणनीतीवर काम केले आहे. त्यामुळे चीनला रोखण्यासाठी आता अमेरिकेकडे काय योजना आहे, हा प्रश्न आहे. अमेरिकेकडे चीनच्या अवकाश मोहिमांबद्दल ठोस माहिती आहे का? चीनकडून अवकाशात शस्त्रसज्जता केली जात असतील तर त्याचे काही पुरावे आहेत का? असतील ते सार्वजनिक करणे आवश्यक आहे; परंतु अमेरिकेची आगामी योजना पाहिली, तर त्यातून फारसे समाधान होत नाही. कारण, 'नासा'ला बायडेन सरकारकडून मोठे बजेट हवे आहे. त्यामुळे त्यांच्या प्रमुखांनी अमेरिकी संसदीय समितीसमोर चीनसंदर्भातील इशारा दिला आहे. चीन हा अमेरिकेच्या अगोदर चंद्रावर पोहोचला, तर तो अन्य देशांना तेथे पोचू देणार नाही, अशी भिती अमेरिकेला वाटत आहे का? याचा अर्थ 'नासा'ला जादा बजेट हवे आहे आणि त्यानुसार लवकरात लवकर चांद्रमोहीम आखता येणे शक्य राहील.

प्रत्यक्षात चंद्रावर अमेरिकेची उपस्थिती सक्षम आहे आणि चीनच्या चांद्रमोहिमेला अद्याप वेळ लागणार आहे; परंतु अमेरिकेची पकड ही निश्चित सैल झाली आहे आणि यासाठी तो स्वत: जबाबदार आहे. अमेरिकेने आपला बराच काळ संशोधन संस्थांसह जगभरातील हुकूमशहा, दहशतवादी संघटना, इराक, अफगाणिस्तान आणि अरब जगावर खर्च केला. या काळात चीनने तंत्रज्ञान आणि विज्ञानावर लक्ष केंद्रित केले. यावरून 'नासा'ची अस्वस्थता लक्षात येते. चीनने 2022 मध्ये पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे वेगळे अवकाश केंद्र स्थापन केले.

या स्थानकाबाबत जगाला फारशी माहिती नाही आणि ही सर्वात धोकादायक बाब आहे. अमेरिका किंवा 'नासा'ला ही गोष्ट लक्षात आली तर तो कोठून सुरुवात करेल, हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, चीनच्या तंत्रज्ञान विकासात अमेरिकेचे सर्वाधिक योगदान राहिले आहे आणि अजूनही त्याचे चीनबाबतचे धोरण स्पष्ट नाही. अमेरिकेकडे अन्य कोणताही मार्ग नाही. त्याला अवकाशात आपली जागतिक आघाडी राखावी लागणार आहे. चीन हा अत्यंत कुरापोतखोर देश आहे. त्यामुळे भारतानेही अवकाश योजनांबाबत सावध राहावे लागेल. चीनच्या सर्व मोहिमा या लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी केल्या जातात. महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने चीन पछाडलेला आहे; त्यामुळे त्याच्या सर्व हालचालींत अत्यंत बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news