पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील शेवाळवाडी परिसरात दोन तरुणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीने गळफास लावून घेतला तर तिला ॲम्बुलन्समधून घेऊन जाताना त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. हडपसर पोलीस तपास करीत आहेत.
सारिका हरिश्चंद्र भागवत (वय- १९ रा. क्रिस्टल सोसायटीकडूनच , शेवाळेवाडी) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय- १९रा. मराठी शाळेसमोर शेवाळेवाडी) अशी आत्महत्या केलेल्या दोन तरुणीची नावे असून, ही घटना शेवाळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ क्रिस्टल सोसायटी या इमारतीत सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हडपसर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा आणि सारिका या दोघी बाल मैत्रिणी होत्या.
मंगळवारी संध्यकाळी सातच्या सुमारास सारिका हिने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तिचा मृतदेह पोलीस रूग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असतानाच, आकांक्षाने पहिले आणि तिने त्याच इमारतीचा पाचवा मजला गाठला. पाचव्या मजल्यावरून उडी मारली. ती रुग्णवाहिकेजवळ पडली. उंचीवरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याने तिचाही मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच घबराट उडाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.