ए. एस. ट्रेडर्स घोटाळा; ईडी चौकशी करणार : देवेंद्र फडणवीस

ए. एस. ट्रेडर्स घोटाळा; ईडी चौकशी करणार : देवेंद्र फडणवीस
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि सांगली येथील गुंतवणूकदारांची ए. एस. ट्रेडर्स आणि त्यांच्या अन्य कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत आवश्यकता भासल्यास ईडीचीही मदत घेतली जाईल, असे सूतोवाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.

यासंदर्भात भाजपच्या आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. जनतेची आर्थिक फसवणूक करून आरोपी विदेशात पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी विदेशातून विविध प्रकारची अ‍ॅप चालवली जातात. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत याचे जाळे पसरले आहे. त्यामुळे अशा प्रकारची आर्थिक फसवणूक आणि गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत क्विक रिस्पॉन्स सिस्टीम उभारली जाईल, असे सांगतानाच गुंतवणुकीतील पैसा विदेशात गेला असेल तर पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशीसाठी ईडीचीही मदत घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

ए. एस. ट्रेडर्सने 398 गुंतवणूकदारांची 40 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. यातील मूळ आरोपी हा पळून गेला आहे का, तो फरार आहे का, त्यासंदर्भात पीएमएलए अंतर्गत कारवाई करणार का, असे प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी राज्य सरकार तयार करीत असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी माहिती दिली.

ते म्हणाले, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अन्य राज्यांशी समन्वय साधून पोलिस तपास सुरू आहे. या गुंतवणुकीतील पैसा विदेशात गेला असेल तर पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशीसाठी ईडीची मदत घेतली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात 35 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 13 जणांना अटक केली आहे. यामधील काही आरोपी पळून गेले असून काही आरोपी विदेशातही पळून गेले आहेत. यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांशी चर्चा करून यामध्ये कारवाया अजून सुुरू आहेत. यामध्ये पहिले आरोपपत्र सादर केले आहे. तपास जसा पुढे जाईल, त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल, त्याचाही आरोपपत्रात समावेश निश्चितपणे केला जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँगे्रसचे जयंत पाटील आणि भाजपचे गणपत गायकवाड यांनीही चर्चेत भाग घेतला.

आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. त्यामुळे बँक, वित्तीय संस्था, समाज माध्यमातील विविध अ‍ॅप हे एकाच प्लॅटफॉर्मवर आणून आपण क्विक रिस्पॉन्स सिस्टीम अ‍ॅपच्या माध्यमातून तयार करीत आहोत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने क्विक रिस्पॉन्स सिस्टीमविषयी सादरीकरण करण्यात आले होेते. त्याचे कौतुकही करण्यात आले. त्यानुसार आता चार ते पाच पोलिस आयुक्तालयात ही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्याचा अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

डिप फेकविषयी जनजागृती आवश्यक

राजकीय नेत्यांसोबत कोणीही फोटो काढून आपण त्यांच्या जवळच्या आहोत, असे सांगून अनेकजण जनतेची फसवणूक करतात. नेत्यांसोबत फोटो काढून कोणी दाखवले तर जनतेने अशा व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नये. आता तर डिप फेकमुळे कोणासोबतही कोणाचेही छायाचित्र जोडून फोटो काढता येतो. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news