पुणे : मेफेड्रोन तस्करीत फौजदाराचा सहभाग? पोलीस वर्तुळात खळबळ

पुणे : मेफेड्रोन तस्करीत फौजदाराचा सहभाग? पोलीस वर्तुळात खळबळ
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्री प्रकरणी हॉटेल कामगाराला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या कामगाराच्या संपर्कातील पोलिस फौजदाराचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.१) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक करण्यात आलेल्या या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका फौजदाराची याप्रकरणी कसून चौकशी सुरू  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर सांगवी पोलिसांनी सापळा रचून नमामी शंकर झा याला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स मिळून आले.

चौकशीत आले फौजदाराचे नाव समोर

पोलिसी खाक्या दाखवत एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी कोठून आणले? याची विचारणा पोलिसांनी केल्यानंतर नमामी झा याने निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका फौजदाराचे नाव घेतले आहे. सांगवी पोलिसांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर संबंधित फौजदाराला सांगवी पोलीस ठाण्यात पाचारण करून त्याची दिवभरापासून चौकशी सुरू होती.

राज्यात खळबळ

संबंधित फौजदाराचा झा याच्याशी कसा संपर्कात आला? झा याने दोन कोटी २ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स कोठून आणले? हे अद्याप उघड झालेले नाही. त्याचबरोबर फौजदाराचा या सगळ्या प्रकरणात नेमका काय संबंध आहे? हे देखील अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, फौजदाराचा ड्रॅग्ज प्रकरणाशी संबंध उघड होत असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

ललित पाटील आणि कुरकुंभ लिंक असण्याची शक्यता

चाकण परिसरातील अडीच वर्षांपूर्वी २० कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स पकडण्यात आले होते. ललित पाटील आणि अन्य लोकांचा सहभाग तेव्हा उघड झाला होता. मात्र, अडीच वर्षानंतर ससून हॉस्पिटल आवारात अडीच कोटींचे एमडी सापडले आणि पुढे काही दिवसातच ललित पाटील हा काही पोलिसांच्या आशीर्वादानेच बंदोबस्तातील पोलिसांच्या हातून ससून मधून निसटल्यानंतर तो राज्यात परिचित झाला. मागील आठवड्यात पुणे पोलिसांनी एक दोन नव्हे तर हजारो कोटी रुपयांचे एमडी पकडले. तसेच कुरकुंभ, रांजणगाव येथील एमडीचे कारखाने उघडकीस आले होते. त्यामुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आता सर्व शक्यता गृहीत धरून तपास करीत आहेत.

  हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news