पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस ठाण्यात काढायला लावल्या उठाबशा

पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट, पोलीस ठाण्यात काढायला लावल्या उठाबशा
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधानांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीला माफी मागण्यासाठी चक्क पोलीस ठाण्यातच कानधरून उठाबशा कराव्या लागल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. पोलीस ठाण्यातील घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची चांगलीच किरकिरी होवू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर टाकलेल्या प्रकाराची माफी मागण्याकरिता सदर व्यक्तीने स्व:हूनच उठाबशा काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र सदर व्यक्तीच्या व्हिडिओमध्ये त्याला उठाबशा काढण्यास भाग पाडण्यात आल्याचे दिसून आहे. या प्रकाराला आता राजकीय रंग लागत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश कुर्झेकार हा ब्रम्हपुरी येथीलच निवासी आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच जाहीर माफी मागून सोशल मीडीयावरून पोस्ट हटविली (डिलीट) केली.

ब्रह्मपुरी येथील स्थानिक काही भाजप कार्यकर्त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे ते आक्रमक होवून ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात सदर व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोहचले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ठाण्यात बोलावून घेतले. यावेळी सदर व्यक्तीने आपली चूक झाल्याचे मान्य केले. माफी मागण्यासाठी होकार दर्शविला व भाजप कार्यकर्ते तसेच पोलिसांसमक्ष "यापुढे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही", अशी कबुली दिली. हा सगळा प्रकार कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकांऱ्यासमक्ष घडला. विशेष म्हणजे मौखिक माफी व सोशल मीडियावर जाहीररीत्या माफी मागितल्यांनंतर सदर व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र, ऐवढ्यावरच समाधान न झाल्याने चक्क त्या व्यक्तीला कानधरून उठाबशा काढण्यास भाग पाडण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

या घटनेतील "सदर व्यक्ती पोलीस ठाण्यात उठाबशा घालत असल्याचा" व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर व्यक्तीने पोलीस ठाण्यात उठाबशा घातल्याची चर्चा आता जोरदार रंगली आहे. मात्र ठाण्यात हा प्रकार घडल्याने पोलिसांना आता ही परिस्थिती हाताळताना सदर व्यक्तीने स्वतः हून उठाबशा केल्याचे सांगावे लागत आहे.

सदर व्यक्तीने स्वतःहून उठाबशा काढल्या : पोलीस उपनिरीक्षक कोरवते

आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी काही भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात येवून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला ठाण्यात बोलावून घेतले. त्याने यापुढे कोणाच्याही विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणार नाही, अशी कबुली देवून माफी मागितली. मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने स्वतःहूनच उठाबशा काढल्या.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : हिजाबचा नेमका इतिहास काय आहे? | Controvercy of Hijab | Karantak Hijab

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news