मॉरिशसमध्ये मराठी ग्रंथालय साकारणार

मॉरिशसमध्ये मराठी ग्रंथालय साकारणार

रत्नागिरी : एखादे काम समर्पण भावनेने केले तर किती मोठे होऊ शकते… सातासमुद्रापार जाऊ शकते. त्याची व्याप्ती, विस्तार किती मोठा होऊ शकतो, हे कोकण मराठी साहित्य परिषदेने दाखवून दिले आहे. मराठी भाषेचे ग्रंथालय आता मॉरिशसमध्ये दिसणार आहे. एकूण 5 हजार पुस्तके कोमसाप देणार असून, त्यापैकी 500 पुस्तके मॉरिशसला रवाना झाली आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मराठी स्पिकिंग युनियन मॉरिशसअंतर्गत मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चर सेंट्रल ट्रस्ट यांच्या सहसंयोजनाने व महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 17 वे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन काही महिन्यांपूर्वी मॉरिशस येथे झाले. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून 100 साहित्यप्रेमी मॉरिशसला गेले होते.

मॉरिशसमधील मराठी भाषिकांची पाचवी पीढी आता तेथे राहत आहे. शैक्षणिक, साहित्य, राजकारण, शासकीय सेवा अशा विविध ठिकाणी तेथे मराठी माणूस काम पाहत आहे. सातासमुद्रापार अनेक पिढ्या महाराष्ट्रापासून दूर राहूनही मराठी मातीशी असलेल्या ओढीने मॉरिशसमध्ये मराठी साहित्य संमेलन घेऊन आपली संस्कृती, नाते जपण्याचा प्रयत्न मॉरिशसमधील मराठी भाषिक करत आहेत.

या संमेलनावेळी तेथील मराठी माणसं कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रेमात पडली. यावेळी त्यांनी आपल्या येथे ग्रंथालय सुरू करावं, अशी मागणी कोमसापकडे केली. याला कोमसापचे विश्वस्तप्रमुख रमेश कीर आणि केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी त्वरित होकार दिला.
त्यानुसार कार्यवाहीलासुद्धा लगेचच सुरूवात केली. तब्बल 500 पुस्तके सुरूवातीला त्यांनी भेट दिली. सध्या या पुस्तकाच्या प्रेमात मॉरिशसची मराठी लोकं पडली आहेत. 5000 पुस्तकं मिळाल्यानंतर तिथे छोटंसं ग्रंथालय उभं राहणार आहे. एकंदरीत कोमसापचं कार्य हे सातासमुद्रापार गेलं आहे. यातून आंतरराष्ट्रीय संस्कृतिची देवाणघेवाण होणार आहे.

मॉरिशसमध्ये मराठी कल्चर चांगलं आहे. आमच्याकडे तेथील लोकांनी ग्रंथालयाची मागणी केली. आम्हालाही ती आवडली. आम्ही 5000 पुस्तकांचे ग्रंथालय उघडणार आहोत. याची सुरुवातही 500 पुस्तकं देऊन केली आहे.
– नमिता कीर, केंद्रीय अध्यक्षा, कोकण मराठी साहित्य परिषद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news