हनुमान जयंती विशेष : नांदूरा येथील १०५ फूटी हनुमानाची भव्य मूर्ती पाहिली का?

हनुमान जयंती विशेष : नांदूरा येथील १०५ फूटी हनुमानाची भव्य मूर्ती पाहिली का?

बुलडाणा; विजय देशमुख : परंपरेनुसार आज (शनिवार) चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री हनुमान जयंती उत्सव सर्वत्र उत्साहाने व भक्तीभावाने साजरा होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत स्थापिलेली हनुमानाची १०५ फूट उंचीची भव्‍य मूर्ती ही देशातील तिस-या क्रमांकाची ऊंच मूर्ती असून, हनुमान भक्तांचे मोठे आकर्षण  ठरले आहे. देशाच्या विविध भागातून ही अनेक भाविक येथे दर्शनाला येतात. या मूर्तीला प्रतिदिन पुष्पमाला अर्पित करण्यासाठी तसेच जलाभिषेक करण्यासाठी रिमोट कंट्रोल प्रणालीची कायमस्वरूपी व्यवस्था केलेली आहे. हनुमान जयंतीदिनी मूर्तीला १०५ फूट उंच व ३५० किलो वजनाचा भव्य पुष्पहार रिमोट कंट्रोलने चढविला जातो.

मिरचीच्या घावूक व्यापाराकरीता नांदूरा येथे स्थायिक झालेले आंध्र प्रदेशचे मूळ निवासी युएसआर मोहनराव यांनी स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने नांदूरा येथे विशाल हनुमान मूर्ती स्थापित करण्याचा संकल्‍प  1999 मध्ये केला. तो दोन वर्षात पूर्णत्वास नेला. ८ नोव्हेंबर २००१ रोजी गोवर्धनपीठ जगन्नाथपूरीचे जगदगुरू शंकराचार्य श्री श्री १०८ निश्चलानंदजी महाराज यांच्या हस्ते या भव्य हनुमान मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा झाली.

पेद्दापूरम (आंध्र प्रदेश) येथील जॉनबाबू नावाच्या मूर्तीकाराने ६० मजूरांच्या मदतीने २१० दिवसांत ही १०५ फूट ऊंचीची हनुमान मूर्ती साकारली. या मूर्तीच्या  एकूण 55 लाख रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते. मूर्तीचा पाया ५० फूट खोल असून, छातीचा घेर ७० फूट आणि पावलांची लांबी ३५ फूट आहे. मूर्तीसाठी ८०० क्विंटल लोखंड व ३७५ ट्रक सिमेंट वापरण्यात आले.

या हनुमान मूर्तीच्या कपाळावर 3 किलो चांदीचा तिलक असून, त्यावर ३०० ग्रॅम सोन्याचा मुलामा आहे. मूर्तीचे डोळे २७ इंच लांब व २४ इंच रूंद असून, ते ॲक्रेलिक पासून बनवलेले आहेत. मूर्तीवर ७ ते १२ इंच व्यासाचे सुमारे एक हजार कृत्रिम रत्न बसविलेले आहेत.

देशातील भव्य हनुमान मूर्तींची प्रसिद्ध स्थळे अशी..

1) हनुमान स्वामी, विजयवाडा (आंध्रप्रदेश) 135 फूट

2) जाखू हनुमान मंदिर, शिमला 108 फूट व संकटमोचन धाम नवी दिल्ली 108 फूट 

3) श्री हनुमानजी, नांदूरा (महाराष्ट्र) 105 फूट

4) हनुमानजी, अग्रहो (हरियाणा) 97 फूट 

5) रामतीर्थ हनुमान, अमृतसर (पंजाब) 80 फूट 

6) हनुमान मूर्ती, गुंटूर (आंध्रप्रदेश) 71 फूट 

7) हनुमान मूर्ती, राऊरकेला (ओडिशा) 75फूट 

8) हनुमानजी झंडेवाला, करोलबाग नवी दिल्ली 65.5 फूट 

9) हनुमानजी, पुट्टपूर्थी (आंध्रप्रदेश) 59 फूट

10) अंजनीसूत हनुमान, डिंडिगुल (तामिळनाडू) 51फूट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news