केवळ वीस हजारांसाठी वकील दांपत्याचा घेतला बळी

केवळ वीस हजारांसाठी वकील दांपत्याचा घेतला बळी
Published on
Updated on

नगर : सिन्नर (जि. नाशिक) येथील न्यायालयातील वॉरंट तोडण्यासाठी अ‍ॅड. आढाव यांना वीस हजार दिले. परंतु, आढाव यांनी काम केले नाही. त्यामुळे आढाव यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्लॅन करून आरोपी किरण दुशिंग व त्याच्या साथीदारांनी वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यात संगमनेर जेलमध्ये एकाच बराकीत राहिलेल्या त्या मित्राचा फोन नंबर पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन गेला, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अ‍ॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीषा आढाव यांचा खून करून त्यांचे मृतदेह उंबरे येथील स्मशानभूमीजवळील विहिरीत टाकले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. किरण ऊर्फ दत्तात्रेय नानाभाऊ दुशिंग (रा. उंबरे, ता. नगर), भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (रा. येवले आखाडा, ता. राहुरी), शुभम संजित महाडिक (रा. गणपतीवाडी शाळेजवळ मानोरी, ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे (वय 20, रा. उंबरे, ता. राहुरी, नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिस तपासात मिळालेली माहिती अशी, आरोपी किरण दुशिंग याच्यावर वावी (ता. सिन्नर) पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. त्यात गुन्ह्यातील वॉरंट तोडण्यासाठी किरणने अ‍ॅड. राजाराम आढाव यांना वीस हजार रुपये दिले होते.

मात्र, त्यानंतरही दुशिंगविरुद्धचे वॉरंट तसेच राहिले. तो सल किरण दुशिंगच्या मनात होता. त्याने वरील साथीदारांना बरोबर घेत अ‍ॅड. आढाव यांच्याकडून पाच ते दहा लाख उकळण्याचा प्लॅन केला. त्यासाठी शुभम महाडिक याने मोठा वाटा उचलला. कारण शुभम आणि आढाव एकाच गावचे असून, शुभमचे वकिलांच्या घरी येणे-जाणे होते. प्लॅननुसार, शुभमने अ‍ॅड. आढाव यांना फोन करून सांगितले, की पाथर्डी न्यायालयात एका मित्राचा जामीन करायचा आहे, त्याचे दहा हजार रुपये माझ्याकडे आले आहेत. पाथर्डीला जाण्याचा विषय असल्याने आढाव तयार झाले. त्यानंतर शुभम त्यांना आणण्यासाठी कोर्टात गेला. हे सर्व जण अ‍ॅड. आढाव यांना घेऊन पाथर्डीकडे निघाले; मात्र त्यांनी आढाव यांना ब्राह्मणी शिवारात नेले. तेथे ते आढाव यांना म्हणाले, की पुण्याला शिकणार्‍या तुमच्या मुलाने मुलीची छेड काढली आहे. त्याचा फोन आला होता. ते प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्यावे लागतील.

मात्र अ‍ॅड. आढाव यांनी, 'माझ्याकडे पैसे नाहीत. आपण पुण्याला जाऊन समोरासमोर बसून प्रकरण मिटवू,' असे सांगितले. आरोपी मात्र 'आधी पैसे द्या' यावरच अडून बसले. नंतर 'मॅडमकडे पैसे असतील,' असे आढाव म्हणाले. मग त्यांनी फोन करून पत्नी मनीषा आढाव यांनाही बोलावून घेतले. त्यांना आणण्यासाठी आरोपी शुभम महाडिक गेला होता. अ‍ॅड. मनीषा आल्यानंतर त्यांनाही मोटारीत बसवले, दोघांचे हात-पाय बांधले आणि सर्व जण मानोरीतील त्यांच्या घरी गेले. वकिलाच्या घरी कामगार होता. त्याला वकिलामार्फत फोन करून निघून जाण्यास सांगितले.

दुपारपासून रात्री आठ वाजेपर्यंत त्यांच्यात पैशांबाबत चर्चा सुरू होती. अ‍ॅड. मनीषा आढाव यांच्या खात्यावरील 64 हजार व 20 हजार अ‍ॅड. राजाराम आढाव यांच्या खात्यावर टाकून घेतले आणि आढाव यांचे एटीएम कार्ड आरोपींनी ताब्यात घेतले. पिनही विचारला. परंतु, वकील दाम्पत्य त्यांना पैसे देण्यास नकारच देत होते. त्यानंतर पुन्हा आरोपी वकील दाम्पत्याला घेऊन ब्राह्मणी शिवारातील वनीकरणात घेऊन गेले. तेथे आरोपींनी डोक्यात पिशवी टाकून श्वास गुदमरवून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह उंबरे स्मशानभूमीजवळील विहिरीत टाकले.

किरण दुशिंगला ताब्यात घेतल्यानंतर तो बोलता झाला आणि खुनाचा आणि त्याच्या विकृत मानसिकतेचाही उलगडा झाला. या तपासात पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, संदीप पवार, सचिन अडबल, भाऊसाहेब काळे यांच्या पथकाने विशेष भूमिका बजावली.

त्या मोटारीने केला तपासाचा मार्ग प्रशस्त
उंबरे येथून वकील दाम्पत्याची मोटार न्यायालयाच्या आवारात उभी करण्यासाठी शुभम महाडिक गेला होता. राहुरीच्या पेट्रोलिंग पथकाने त्याला पाहिले तेव्हा आरोपींची पळापळ झाली. त्या मोटारीत पोलिसांना तपासात महत्त्वपूर्ण ठेरलेल्या काही महत्त्वाच्या वस्तू मिळाल्या.

ते सिम कार्ड ठरले तपासाचा दुवा
आरोपी किरण दुशिंग संगमनेर जेलमध्ये असताना त्याची एका आरोपीशी ओळख झाली. या गुन्ह्यात किरणने त्या आरोपीच्या नावावर असलेले सिम कार्ड फोन करण्यासाठी वापरले. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दुशिंगपर्यंत पोहोचण्यास मदत झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news