गालिचासारखी दिसणारी आकाशगंगा

गालिचासारखी दिसणारी आकाशगंगा

वॉशिंग्टन : आपली पृथ्वी ज्या सौरमालिकेचा एक भाग आहे, अशा अनेक सौरमालिकांना सामावून घेणार्‍या आपल्या आकाशगंगेचे नाव 'मिल्की वे' आहे. 'मिल्की वे'सारख्या असंख्य आकाशगंगा या अंतराळाच्या अनंत पसार्‍यामध्ये आहेत. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. आता 'हबल' या अंतराळ दुर्बिणीने चक्क गालिचासारख्या दिसणार्‍या एका अनोख्या आकाशगंगेचे छायाचित्र टिपले आहे. ही आकाशगंगा पृथ्वीपासून 60 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीने या आकाशगंगेची प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. या आकाशगंगेला 'एनजीसी 4753' असे नाव देण्यात आले आहे. या प्रतिमेत ही आकाशगंगा किनार्‍याच्या बाजूने दिसते. 'ईएसए'ने म्हटले आहे की, या आकाशगंगेचा आकार वास्तविकपणे अंडाकार असून तिच्या भुजा अस्पष्ट सर्पिलाकार आहेत. या आकाशगंगेचे 'हबल'ने हे आतापर्यंतचे अतिशय सर्वात स्पष्ट असे छायाचित्र टिपले आहे.

त्यामध्ये आकाशगंगेची धुळीने भरलेली संरचनाही दिसून येते. या आकाशगंगेचा शोध सन 1784 मध्ये विल्यम हर्शेल या खगोलशास्त्रज्ञाने लावला होता. ही आकाशगंगा कन्या तारामंडळात असून तिथे अशा सुमारे शंभर आकाशगंगा आणि गॅलेक्सी क्लस्टर्स आहेत. या आकाशगंगेत जवळच्या एका छोट्या आकाशगंगेचा विलय झालेला आहे. हा विलय सुमारे 1.3 अब्ज वर्षांपूर्वी झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news