औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातही कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहर आणि ग्रामीण भागात रात्री ९ ते पहाटे ६ वाजेदरम्यान जमावबंदीचे आदेश शनिवारी (दि. २५) रात्री उशीराने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांड्ये यांच्या संयुक्त स्वाक्षरीने जारी केले आहे. यानुसार रात्री ९ नंतर पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर प्रतिबंध राहणार आहे. याशिवाय लग्न, मेळावे, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांतील उपस्थितीवरही निर्बंध घातले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या रुग्ण संख्येत वाढ नसली तरी ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. दोन रुग्णांचा जिनोम सिक्वन्सींगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरून गेले आहे. हे रुग्ण आतापर्यंत ज्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यासर्वांच्या 'आरटीपीसीआर' चाचण्या करण्यात आल्या आहेत. इतरांचाही शोध घेणे सुरूच असल्याचे प्रशासनाकडून सागण्यात येत आहे.
जिल्ह्यात धोका वाढू नये, यासाठी प्रशासनाने सकर्ततेची पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी (दि. २५) मध्यरात्रीपासूनच जमावबंदी जारी करण्यात आली आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात सर्वत्र पाचपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. लग्न समारंभांसह धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम, मेळाव्यांतील नागरिकांच्या उपस्थितीवरही निर्बंध राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच इतर निर्बंधांबाबत साेमवारी (दि. २७) जिल्हाधिकारी चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता, मनपा आयुक्त पांड्ये हे संयुक्तपणे निर्णय घेणार आहेत.
…असे आहेत निर्बंध
विवाह समारंभ, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम मेळाव्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल, सभागृहांमध्ये १०० अधिक व्यक्ती नको. खुल्या जागेतील समारंभांसाठी २५० अथवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा अधिक लोक नसावे. या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यासाठी बंद जागेसाठी उपस्थितांची संख्या ५० टक्केपेक्षा जास्त राहू नये. मोकळ्या जागेतील अशा कार्यक्रमांसाठी क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थिती बंधनकारक राहणार आहे. क्रीडा कार्यक्रम, स्पर्धांसाठी आयोजन स्थळाच्या आसण क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा अधिक नसावी. जिल्ह्यात सर्वत्र रात्री ९ ते सकाळी ६ वाजेदरम्यान जमावबंदी लागू राहील. या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर प्रतिबंध राहणार आहे.
हेही वाचलं का?