पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०७ म्हणजेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, एका माध्यम प्रतिनिधीची देखील कसून चौकशी सुरू आहे.
मनोज भास्कर गरबडे (३४, रा. अक्षय सोसायटी, स्टेशन रोड पिंपरी), धनंजय भाऊसाहेब इजगज (२९, रा. आनंदनगर, चिंचवड), विजय धर्मा ओहोळ (४०, रा. आनंदनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका फौजदाराने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान, ते चिंचवडगाव येथील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी आरोपींनी आपसात संगनमत करून त्यांच्या अंगावर शाई फेकली.
चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे, ही बाब माहिती असताना देखील आरोपींनी चेहऱ्यावर काळ्या रंगाचे द्रव्य टाकले. त्यांच्या जीवाला धोका केला निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. तुला सोडणार नाही, असे म्हणत भीतीचे वातावरण तयार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून शनिवारी रात्री उशीरा शहरातील एका पत्रकाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. संबधित पत्रकाराचा मोबाईल जप्त केला असून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.