पुणे : पुढारीवृत्तसेवा: तुमचा पोपट सारखा शिट्ट्या मारतो, ओरडतो असे कारण देत त्याला तुम्ही दुसरीकडे कुठेतरी ठेवा म्हणल्याच्या कारणातून धमकाविणार्या शेजारार्या विरुद्ध आजोबांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याची घटना पुण्यात घडली. शिवाजीनगर येथील तुळशी मार्केटमधील महात्मा गांधी वसाहतीत राहणार्या तसेच पोपट पाळणार्या व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एका 72 वर्षीय आजोबांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर धमकावल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आजोबा आणि संबधीत व्यक्ती हे शिवाजीनगर येथील तुळशी मार्केट शेजारी महात्मा गांधी वसाहतीत समोरासमोर राहण्यास आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने त्यांच्या घरी पोपट पाळला आहे. त्यांचा पोपट वारंवार शिट्ट्या मारणे, ओरडणे असा प्रकार करत असल्याने वृद्ध आजोबांना याचा त्रास होत होता. आजोबांनी तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही त्याला दुसरीकडे कुठेतरी ठेवा असे सांगितले होते. याच सांगण्यावरून आजोबा आणि समोर राहणार्या व्यक्ती बरोबर त्यांचे वाद झाले. यावेळी गैरअर्जदार व्यक्तीने तक्रारदार आजोबा यांना शिवीगाळ करत त्यांना मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 5 ऑगस्ट रोजी घडला. याच वादातून आजोबांनी थेट पोलिस ठाणे गाठून त्यांच्या विरोधात तक्रार दिली.
याबाबत दोघांना बोलवून समज देण्यात आली असून पुन्हा वाद न घालण्याच्या सूचना दोघांना देण्यात आल्या आहेत. तसेच आजोबांच्या समोर राहणार्या व्यक्तीला त्यांच्या पोपटाचा त्रास आजोबांना होणार नाही याबाबत काळजी घेण्याचे देखील त्यांना सांगण्यात आहे.
– दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक खडकी पोलिस ठाणे.