file photo
file photo

कर्ज बुडवल्याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मोहित कंबोज यांच्या कंपनीने 52.08 कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे मोहित कंबोज यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते, त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात मोहित कंबोज यांच्या कंपनीने हे कर्ज बुडवले होते. या प्रकरणात मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, कंबोज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, मुंबई पोलिसांनी 2017 मध्ये बंद झालेल्या कंपनीतील बँक व्यवहारासंदर्भातील त्रुटी शोधून माझ्याविरोधात बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारचा गुन्हा दाखल करून माझा आवाज दाबता येईल, असे महाविकास आघाडी सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. महाविकास आघाडी सरकारला संजय राऊत किंवा नवाब मलिकांवरील कारवाईचा बदला घ्यायचा असेल. माझी लढाई सुरूच राहील. मी न्यायालयात जाऊन या सगळ्याविरोधात कायदेशीररित्या दाद मागेन, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून मोहित कंबोज हे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या बरोबरीने महाविकास आघाडीवर हल्ला चढवण्यात आघाडीवर होते. नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले होते. कंबोज यांनी हनुमान चालीसा वादातही उडी घेत मशिदींसमोर लावण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भोंग्यांचे वाटप केले होते. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत वाद सुरु असताना मातोश्रीपासून काही अंतरावर शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्लाही केला होता.

हे ही वाचलंत का? 

logo
Pudhari News
pudhari.news