मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत तालुक्यातील इयत्ता आठवी वर्गात शिकत असलेल्या एका १४ वर्षीय मुलीवर गावातील एका युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात युवकावर लैंगिक अत्याचाराविरूद्ध संरक्षण अधिनियम २०१२ पॉक्सो कायद्याअंतर्गत बुधवारी (दि. २० ) रात्री ११ : ३० सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव कृष्णा रामराव चव्हाण असे असून तो घटनेनंतर फरार झाला आहे.
संबंधित बातम्या
याबाबत माहिती अशी की, पडित मुलीचे आई- वडील व इतर भावंडे कामानिमित्त सहा महिन्यांपूर्वी परराज्यात गेले होते. दरम्यान १४ वर्षीय मुलगी तिच्या घरी लहान बहिणीसोबत एकटीच राहत होती. सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सदरील मुलगी तिच्या चुलत बहिणीसोबत गावातील नदीपात्रात बाथरूमला गेली होती. यावेळी कृष्णा चव्हाण याने मुलगीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तर यावेळी सोबत असलेली तिची चुलत बहीण घरी पळून गेली.
याप्रकरणी पीडित मुलगीचे पालक बुधवारी (दि. २० ) रोजी परराज्यातून घरी आल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कृष्णा चव्हाण हा फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिसा के. सय्यद या करीत आहेत.