आशिया क्रिकेट सम्राज्ञी

आशिया क्रिकेट सम्राज्ञी

सन 2004 पासून चालू झालेल्या या महिला आशिया चषकाच्या आठ आवृत्त्यांत भारतीय महिलांनी सातवेळा अजिंक्यपद पटकावले आहे. 2018 साली 14 वर्षांतील सलग 6 आशिया चषक जिंकण्याची आपली वाटचाल बांगला देशने रोखली; पण यंदा आपण हा मुकुट पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यंदाच्या आशिया चषकात भारतीय संघाचा जो दबदबा होता ते बघता आशिया चषक कोण जिंकणार? हे स्पष्ट होते. आपल्या वाटचालीत एकच मिठाचा खडा पडला तो म्हणजे साखळी सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून आपल्या वाट्याला आलेला पराभव. गेल्या काही महिन्यांचा विचार केला, तर असे एक-दोन पराभव सोडले; तर भारतीय महिला संघाची वाटचाल स्वप्नवत आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, इंग्लंडमध्ये मालिका विजय, यावर आशिया चषकातील यशाने कळस चढवला.

आजच्या घडीला महिला टी-20 संघांचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. ऑस्ट्रेलिया 299 मानांकन गुणांनी पहिल्या स्थानावर आहे, इंग्लड 281 गुणांनी दुसर्‍या, न्यूझीलंड 273 गुणांनी तिसर्‍या, तर भारत 265 गुणांनी चौथ्या स्थानावर आहे. हे मानांकन गुण ठरवताना तुम्ही किती सामन्यांत किती गुण मिळवले आहेत यावरून ठरवले जाते. तेव्हा ऑस्ट्रेलियाचे 5,085 हे एकूण गुण जरी भारताच्या 8,485 या एकूण गुणांपेक्षा कमी असले, तरी ऑस्ट्रलियाने हे फक्त 17 सामन्यांत कमावले आहेत, तर भारताने हे गुण मिळवायला 32 सामने घेतले आहेत. यावरून जरी मानांकन म्हणजेच रेटिंगच्या गुणात जरी पहिल्या चार संघांत जास्त फरक नसला, तरी ऑस्ट्रेलियाला हरवायला बाकी संघांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

आशिया चषकातील संघांचा विचार केला, तर प्रमुख संघांपैकी पाकिस्तान 230 गुणांनी 6 व्या स्थानावर, श्रीलंका 209 गुणांनी 8 व्या स्थानावर, तर बांगला देश 193 गुणांनी 9 व्या स्थानावर आहेत. बाकीचे छोटे संघ म्हणजे थायलंड 12 व्या, यूएई 15 व्या आणि मलेशिया 27 व्या स्थानावर आहेत. तेव्हा भारताच्या जवळपास यायला बाकीच्या आशिया संघांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. गतविजेत्या बांगला देशला मागे टाकत थायलंडने यावेळेला उपांत्य फेरी गाठली. नाही तर आशिया चषक ही प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि श्रीलंका यांच्यातच लढत असते.

भारताच्या महिला संघाच्या प्रगतीचा आलेख हा गेल्या काही वर्षांत उंचावण्याची अनेक कारणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे भारतात आता महिला संघाला मिळणार्‍या सोयीसुविधा, आर्थिक पाठबळ आणि त्यामुळे अनेक नवीन युवा खेळाडूंचा अव्याहत ओढा आपल्याकडे आहे. थायलंडच्या संघाशी आपली तुलना करणे योग्य नाही; पण क्रिकेट फोफावण्याचा वेग आणि त्या योगाने येणार्‍या सुविधांचा फरक लक्षात घेतला, तर एखाद्या संघाची प्रगती कशी होते ते कळून येईल.

थायलंडचे प्रशिक्षक हर्षल पाठक जेव्हा सांगतात की, क्रिकेटची लोकप्रियता वाढवण्यापासून त्यांना प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे युवा खेळाडूंत उत्सुकता तयार होते. नुसती उत्सुकता असून भागत नाही, तर थायलंडच्या खेळाडूंना पुण्याच्या पी.वाय.सी. हिंदू जिमखान्यावर क्रिकेटच्या उत्तम प्रशिक्षण आणि सरावासाठी येणे गरजेचे वाटते. भारतात आज सुदैवाने महिला क्रिकेट बहुतांशी मोठ्या क्रिकेट केंद्रात पोहोचले आहे. क्रिकेट हा धर्म असल्याने इथे क्रिकेटचा वेगळा प्रसार करायची गरज नाही. कुणी क्रिकेटला खेळ, कुणी जगण्याचे साधन, तर कुणी पैसा म्हणून बघितले; तरी भारत आज क्रिकेटपटूंच्या सर्व गरजा पूर्ण करणारे एक सामर्थ्यशाली केंद्र तयार झाले आहे. महिला क्रिकेटची उत्तम कामगिरी, पुढील वर्षी सुरू होणारी महिला आयपीएल या सर्व महिला क्रिकेटचा प्रसार आणि गुणवत्ता वाढवायला पोषक अशा गोष्टी आहेत.

भारतीय महिला क्रिकेटच्या या यशाच्या वाटचालीत प्रशिक्षक रमेश पोवार यांचा प्रमुख वाटा आहे. 2018 मध्ये मिथाली राजशी खटके उडाल्यावर पोवार यांची गच्छंती झाली; पण तोपर्यंत त्यांनी भारतीय संघाच्या विचारसरणीचा चेहरामोहरा बदलवून टाकला होता. यामुळेच तेव्हाची टी-20 संघाची उपकर्णधार आणि आजची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांनी 'बीसीसीआय'ला पात्र पाठवून रमेश पोवार हेच कसे प्रशिक्षक म्हणून योग्य आहेत, हे कळवले तसेच मिथाली राजला वगळायचा निर्णय हा संघाचा होता; तर पोवार यांचा वैयक्तिक नव्हता, हेही स्पष्ट केले. जेव्हा डब्ल्यू. व्ही. रामन प्रशिक्षक म्हणून विशेष छाप पाडू शकले नाहीत तेव्हा मदनलाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सुधारणा समितीने आठ संभाव्य प्रशिक्षकांच्या मुलाखती घेऊन पुन्हा रमेश पोवार यांचीच नियुक्ती केली.

असं काय विशेष आहे रमेश पोवार यांच्या प्रशिक्षणात? एक तर मुंबईचा क्रिकेटपटू हा जात्याच क्रिकेटमधला खडूस म्हणून ओळखला जातो. मुंबईच्या संघर्षमय आयुष्याने 'छोडना नहीं' ही वृत्ती त्याच्या रक्तात आपोआप भिनली जाते. रमेश पोवार यांनी नेमके हेच संघाच्या विचारसरणीत उतरवले. त्यांनी प्रत्येक खेळाडूला त्याच्या कामगिरीसाठी टार्गेटस् दिली आणि ती हळूहळू वाढवत नेली. या वैयक्तिक कामगिरीच्या आलेख उंचावण्यातून सांघिक कामगिरीचा आलेख आपोआप उंचावत गेला. या प्रवासात नुसती टार्गेटस् देऊन उपयोग नसतो; तर प्रत्येक खेळाडूला व्यक्त व्हायला मुक्तता देणे, त्या खेळाडूचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्या खेळाडूची संघातील भूमिका काय आहे, याची निश्चित कल्पना देणे, हेही पोवार यांनी अचूकपणे केले. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या डोळ्याला डोळा भिडवून खेळणे हे जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास ठासून भरला असतो तेव्हाच हे शक्य होते. पुरुष संघात ही सुरुवात सौरव गांगुलीने केली. महिला क्रिकेटमध्ये ही दादागिरी आता आपण करायला लागलो आहोत.

गेल्या महिन्यात जेव्हा दीप्ती शर्माने 'आयसीसी' नियमांचा फायदा घेत इंग्लंडच्या खेळाडूला धावबाद करत सामना जिंकला तेव्हा समस्त इंग्लिश प्रेस आणि खेळाडूंनी अखिलाडूवृत्ती म्हणून नाके मुरडले; पण कर्णधार हरमनप्रीत कौर आपल्या खेळाडूंशी ठामपणे उभी राहिली. इतकेच नाही, तर जेव्हा इंग्लिश मीडियाने तिला त्या धावबाद प्रकरणाबद्दल विचारले, तेव्हा तुम्ही बाकीच्या नऊ विकेटस्बद्दल का विचारत नाही, असे तडफदार उत्तर देत त्यांना गप्प केले. याची तुलना जर फ्लिटंऑफ वानखेडेवर सामना जिंकल्यावर शर्ट काढून नाचू शकतो, तर आम्ही लॉर्डस्वरही हे करू शकतो, या गांगुलीच्या 2002 च्या नॅटवेस्ट ट्रॉफीच्या कृतीशी होऊ शकते.

आज भारतीय महिला संघातील अनेक खेळाडू स्टार बनल्या आहेत आणि जगातील महिला लीगमध्ये त्या खेळत आहेत. सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश महिलांच्या लीगमध्ये पूजा वस्त्राकर ब्रिस्बेनच्या, जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत मेलबर्नच्या संघातून खेळत आहेत. स्मृती मानधना याआधी सिडनीच्या संघातून खेळली आहे. या विविध देशांत खेळायच्या अनुभवाने या खेळाडू परिपक्व होत आहेत.

भारतीय महिला क्रिकेटचा नाही, तर एकूणच महिला क्रिकेटच्या कक्षा रुंदावत आहेत आणि महिला क्रिकेटसाठी हे उत्तम लक्षण आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे, ते म्हणजे पुरुष आणि महिला क्रिकेटपटू यांच्या वयाचा आलेख बघितला आणि आयुष्यात येणारी स्थित्यंतरे बघितली, तर त्याच वयाच्या चौकटीत एका महिला खेळाडूला जास्त बदलांना सामोरे जावे लागते. टेनिसचे उदाहरण घ्यायचे, तर ग्रँड स्लॅमपैकी यूएस ओपनमध्ये पुरुष आणि महिला विजेत्यांची विजेतेपदाची रक्कम 1973 सालापासून आहे. बाकीच्या सर्व ग्रँड स्लॅमनेही हा कित्ता गिरवायला मात्र 2007 साल उजाडले. क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला विजेतेपदाच्या रकमेत, त्यांच्या श्रेणीप्रमाणे होणार्‍या करारात अजून खूप तफावत आहे.

यंदाच्या आशिया चषकाचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर जेव्हा श्रीलंकेच्या पुरुष संघाने पाकिस्तानला नमवून आशिया चषक जिंकला तेव्हा त्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम ही 1 कोटी 60 लाख रुपये होती, तर आपल्या महिला संघाने श्रीलंकेला हरवून आशिया चषकाचा मानकरी झाल्यावर त्यांच्या विजेतेपदाची बक्षिसाची रक्कम ही निव्वळ 20,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजे 16 लाख होती. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू रेणुका सिंगला 1 हजार डॉलर्स, तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू दीप्ती शर्माला दोन हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले. पुरुषांच्या क्रिकेटच्या मानाने ही रक्कम अगदी तुटपुंजी आहे. महिला क्रिकेट आज चांगलेच फोफावत आहे. जर त्याचा दर्जा आणि प्रसार राखायचा असेल, तर आर्थिकस्तरावर स्त्री-पुरुष समानातही यात यावी लागेल.

निमिष वा. पाटगावकर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news