‘बीटीएस’ची तरुणाईला भुरळ

‘बीटीएस’ची तरुणाईला भुरळ
Published on
Updated on

'बीटीएस' या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणार्‍या सर्वांमध्ये दिसतेय. त्यांनी लाईव्ह कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय.

दुसरीला असलेल्या लेकाच्या शाळेच्या रफवहीत एक लिस्ट सापडली. त्यावर लिहिलंं होतं, 'बीटीएस.' त्याखाली एकेक नावं लिहिलेली होती. जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, वी, जुंगकूक. मी त्याला विचारलं, हा काय प्रकार आहे? त्यानं सांगितलं, 'बाबा, ही 'बीटीएस'ची नावं आहेत. आम्ही शाळेतलं सगळे मित्र 'बीटीएस आर्मी'त आहोत.'

'बीटीएस आर्मी' हे ऐकूनच माझ्या डोक्यात गोळीबार सुरू झाला होता; मग त्यानं समजावून सांगितलं की, 'बीटीएस' हा कोरियन बँड आहे. आम्हा सगळ्या मित्रांना तो फार आवडतो. आम्ही यूट्यूबवर त्यांचे व्हिडीओ बघतो. त्यावर शाळेत एकमेकांशी बोलतो. त्यांचे फोटो जमा करतो. आम्ही त्यांचे फॅन आहोत, म्हणून आम्ही सगळे 'बीटीएस आर्मी.' ही आर्मी म्हणजे लढाई करणारी आर्मी नाही.

'बीटीएस' हा दक्षिण कोरियन बँड 'के-पॉप' म्हणजे कोरियन पॉप प्रकारची गाणी म्हणतो. खरं तर हे सगळं के-पॉप कल्चरच भन्नाट आणि जगभर क्रेझ असलेलं आहे. त्यात 'बीटीएस' हा मुलांचा आणि 'ब्लॅक पिंक' या मुलींच्या बँडला वेड्यासारखी फॅन फॉलोईंग आहे. फक्त 'बीटीएस'ची माहिती सांगणारीही यूट्यूब चॅनेल आहेत, सोशल मीडियावर पेज आहेत आणि असं खूप काही! सगळा मिळून हा अब्जावधी डॉलरचा धंदा आहे.

'बीटीएस' नावानं ओळखले जाणारे जिन, सुगा, जे-होप, आरएम, जिमिन, वी, जुंगकूक हे सातजण आज अब्जाधीश आहेत; पण त्यांचं राहणं, बोलणं, वागणं आणि मुख्य म्हणजे गाणं हे बिलकुलच अब्जाधीशांसारखं उच्चभ्रू नाही. गाण्यातून ते जे काही मांडतात ते साधं, सोपं आणि कुणालाही भावेल, असंच आहे. मुख्य म्हणजे, ते माणसाच्या माणूसपणाचं आणि माणूसपणातल्या चांगुलपणाचं सेलिब्रेशन करताहेत. त्यामुळेच या सात तरुण मुलांनी आज जग जिंकलंय.

'बीटीएस' हा खरं तर 'बँगटन सोनिएंडन'चा शॉर्टफॉर्म आहे. हा एक कोरियन भाषेतला वाक्प्रचार आहे. त्याचा सर्वसाधारणपणे अर्थ असा आहे की, आम्ही सगळे बुलेटप्रूफ, अनब्रेकेबल म्हणजेच अभंग आणि अनबीटेबल म्हणजेच अजिंक्य आहोत. हे नाव अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात की, तरुणांबद्दल जगभरात एका ठराविक पद्धतीनं विचार केला जातो. या तरुणाईच्या वाटेला कायमच त्याच त्याच उपेक्षा, टीका आणि हेटाळणी येते. साधारणतः, 'ही आजकालची पोरं म्हणजे…' या शब्दांनी सुरू होणार्‍या वाक्यांविरुद्ध केलेला हा एल्गार आहे. कितीही पडलो, झडलो तरी पुन्हा उठू, असा विश्वास म्हणजे 'बँगटन सोनिएंडन.' तरुणाईविषयीच्या स्टिरियोटाईप मोडून काढण्याची भाषा करणारी, ही सातजण नक्की करतात तरी काय? खरं तर या पोरांचं वय गोडगुलाबी गाणी म्हणण्याचं; पण हे सातजण जी गाणी म्हणतात ती त्या पलीकडली आहेत. 'बीटीएस'चे अल्बम स्वतःला स्वीकारण्याची गोष्ट सांगतात.

रॅपच्या माध्यमातून ते मानसिक आरोग्य, तरुणाईचे प्रश्न, राजकारण अशा मुद्द्यांवर भाष्य करतात. हे सगळे विषय ते लोकांना आवडतील अशा पद्धतीनं सांगतात. त्यामुळे त्यांचे अल्बम हे अनेकदा चार्टबस्टर ठरलेत. आज सर्वत्र एकटेपणा, स्वार्थ, राजकीय द्वेष, भेदाभेद वाढत असताना, एकमेकांशी चांगलं वागणं हे अत्यंत गरजेचं आणि सोपं आहे. आपण तेवढं जरी करू शकलो, तरी फार मोठा बदल घडू शकतो, हे ते सातत्यानं आपल्या गाण्यांतून मांडत राहतात. त्यांचं हे प्रामाणिक मांडणंच लोकांना आपलंसं वाटतंय.

'बीटीएस' आज जरी प्रचंड यशस्वी असलं, तरी त्यांचं हे यश अपयशामधून आलंय. आधी हौस; मग प्रयत्न आणि त्यातून आलेलं अपयश त्यांनी पाहिलंय. जगभरात कौतुक होत असताना, स्वतःच्या देशात मात्र उपेक्षा, असेही दिवस त्यांनी पाहिलेत. एकवेळ तर अशी आली होती की, दिवाळखोरी जाहीर करावी लागेल, अशी परिस्थिती होती. तेव्हा त्यांनी ग्रुप बंद करण्याचंही ठरवलं होतं; पण त्यांनी तरीही हार मानली नाही. प्रत्येकवेळी न डगमगता पुन्हा नव्यानं सुरुवात केली. त्यांच्या या फिनिक्ससारख्या राखेतून झेप घेण्याच्या प्रयत्नांचं प्रतिबिंबच त्यांच्या गाण्यांमधून उमटतं. त्यामुळे ते कायमच लोकांना प्रेरणा देणारं ठरतं. यामुळे आणखी एक गोष्ट घडलीय. हे सातही जण आज तुफान यशस्वी ठरले, तरी त्यांचे पाय जमिनीवर राहिलेत. त्यांनी आपल्या डोक्यात हवा जाऊ दिलेली नाही. ते सेलिब्रिटी असले, तरी सेलिब्रिटीहूड मात्र ते कधीच मिरवत नाहीत. ते कायम हेच सांगतात की, आम्ही कुठून आलो याचं आम्हाला सदैव भान आहे. त्यांची हीच गोष्ट लोकांना प्रचंड आवडते. त्यामुळेच लोक 'बीटीएस'कडे प्रेरणा म्हणून पाहतात.

एवढंच नाही, तर 'बीटीएस'चे सभासद आपल्या स्टारडमचा आणि प्रसिद्धीचा उपयोग वाईट गोष्टींसाठी करत नाहीत. ते कायम सामाजिक आणि लोकोपयोगी गोष्टींसाठीच याचा वापर करतात. त्यांनी दिलेल्या देणग्या हा त्यामुळेच चर्चेचा विषय ठरतो.

चमकोगिरी करण्याचे दिवस असताना, 'बीटीएस'नं जगभरातल्या विविध सामाजिक उपक्रमांना दिलेल्या प्रचंड मदत निधीची कधीच जाहिरात केली नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच वाढलाय.

लॉकडाऊनच्या काळात त्यांनी केलेल्या व्हर्च्युअल कन्सर्टला तर जगभरातल्या लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लहान मुलांच्या कुपोषणावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला, तर सारं जग त्यांच्या सोबत आलं. 'युनिसेफ'सोबत त्यांनी फक्त करार केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत दहा लाख डॉलर जमा झाले. या सगळ्यामुळेच 'बीटीएस' हे चांगुलपणाचं सेलिब्रेशन ठरलंय.

'बीटीएस'च्या सातजणांची नावं अनेकांना माहिती आहेत; पण त्यांना जोडणारं आठवं नाव आहे, बँग पीडी! बिग हिट ही त्यावेळची छोटीशी म्युझिक कंपनी सुरू करणार्‍या बँग पीडींना 2010 मध्ये आरएमसोबत एक हिपहॉप ग्रुप करायचा होता; पण ते फारसं काही जमलं नाही. अखेर त्यांनी योजना बदलली आणि 2013 मध्ये 'टू कूल फॉर स्कूल' या नावानं 'बीटीएस'चा पहिला अल्बम बाजारात आणला. पालकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांना दिलेलं हे उत्तर होतं. या अल्बमनं 'बीटीएस' हे नाव लोकांच्या डोक्यात फिट्ट केलं. शाळा-कॉलेजच्या पोरांना आपली भूमिका मांडणारी गँग मिळाल्यानं त्यांनीही या ग्रुपला आपलं मानलं आणि ही गाणी त्यांचा आवाज बनली.

पुढे 2015 मध्ये 'आय नीड यू' हे गाणं आलं. या गाण्याला एमटीव्हीचा पुरस्कार मिळाला. हा त्यांचा पहिला पुरस्कार होता. त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या त्यांच्या 'विंग्स' या अल्बममुळे त्यांना खर्‍या अर्थानं ओळख मिळाली. त्यांच्या अनेक अल्बमनी म्युझिक चार्टवर टॉप रँकिंग मिळवलं. कोरियाची हद्द ओलांडून त्यांनी जपानच्या म्युझिक मार्केटमध्ये हंगामा केला. पुढे त्यांनी आशियातले विविध देश पालथे घातले; मग अमेरिकेत आणि युरोपमध्येही त्यांचा मोठा फॅन बेस वाढला. जगभरातले अनेक म्युझिक अ‍ॅवॉर्ड त्यांनी खिशात टाकलेत. बिलबोर्ड रँकिंगमध्ये तर त्यांनी 'बीटल्स'शी बरोबरी केलीय.

आज हे सातजण शाळा-कॉलेजातल्या मुलांचे हीरो ठरलेत. आरएम हा या सातजणांचा टीम लीडर. त्याचं मूळ नाव किम नाम जून. दक्षिण कोरियातला हा गाणं बजावणं करणारा मुलगा आज जगातल्या सर्वात लोकप्रिय 'बीटीएस' बँडचा म्होरक्या आहे. त्याचं वय फक्त 28 वर्षं आहे. 'बीटीएस'चे जगभर पसरलेले फॅन स्वतःला 'बीटीएस आर्मी' म्हणवून घेतात. तेच या बँडला सोशल मीडियावर प्रचंड प्रमोट करतात. त्यांचे पोस्टर घरात लावतात. टीशर्ट घालतात. स्टेटस ठेवतात आणि काय काय करतात ते त्यांचं त्यांनाच माहीत.

कोरियन पॉप्युलर संगीत म्हणजेच के-पॉप गेल्या तीसेक वर्षांत तुफान लोकप्रिय ठरलंय. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियातला संघर्ष, जागतिकीकरणामुळं मध्यमवर्गाची बदललेली गणितं, तंत्रज्ञान आणि संवादक्रांतीमुळे छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्येे झालेले मूलगामी बदल, या सगळ्या पार्श्वभूमीवर के-पॉप या संगीताकडे पाहायला हवं. या संगीतातून तरुण मुलांनी मांडलेल्या भावना म्हणजे त्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या परिस्थितीला संगीतातून दिलेलं उत्तर आहे, हे मुळात आपण समजून घ्यायला हवं. जुन्या रूढींवर मात करणं, देशा-देशांतल्या सीमा नाकारणं, मानसिक आजारांबद्दल खुलेपणानं बोलणं, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणं, लैंगिक भेदाभेदांविरुद्ध ठामपणे उभं राहणं, या सगळ्यामुळे के-पॉप हे जागतिकीकरणाच्या काळातलं बंड आहे. भारतानं कायमच जगातलं चांगलं संगीत स्वीकारलंय आणि जगाला आपल्याकडलं चांगलं दिलंय. गेल्या काही दशकांमधली नावं घ्यायचीच झाली, तर रविशंकर, लता मंगेशकरांपासून ए. आर. रेहमानपर्यंत आणि बीटल्स, मायकल जॅक्सनपासून आताच्या 'बीटीएस'पर्यंत हा प्रवाह सतत वाहतच राहणार आहे.

नीलेश बने

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news