Cinema : ऐतिहासिक ’भूत’काळ सिनेमाच्या मानगुटीवर

Cinema
Cinema

कोरोनाने बेजार झालेल्या सिनेजगतासाठी 2022 हे वर्ष समाधानकारक ठरलं. वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचा मनापासून प्रयत्न केला. त्यातले काही चालले, काही आपटले. पण खरी चर्चा झाली ती बायोपिक आणि ऐतिहासिक घडामोडींना हात घालणार्‍या सिनेमांची. या सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नव्या वर्षातही पुन्हा हेच चित्र अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे दीड वर्षाहून अधिक काळ भारतीय सिनेजगतात उदास वातावरण होतं. त्यामानाने 2022 हे वर्ष उभारी घेऊ पाहणार्‍या सिनेजगतासाठी आशादायक चित्र निर्माण करून गेलं. प्रादेशिक सिनेमांचं बॉक्स ऑफिसवरचं वर्चस्व, राजकीय हस्तक्षेपामुळे बळावलेली बॉयकॉट मोहीम, ओटीटी आणि थिएटरमधला चुरशीचा सामना… अशा एक ना अनेक गोष्टींमुळे 2022 हे वर्ष सिनेरसिकांच्या आठवणीत राहील.

2022 मध्ये आलेल्या काही बहुप्रतीक्षित सिनेमांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली तर काही सिनेमांनी अनपेक्षितपणे कानामागून येऊन तिखट होण्याचा मानही मिळवला. गेल्या वर्षभरात आलेल्या बहुचर्चित सिनेमांच्या किंवा वेबसीरिजच्या यादीवर नजर टाकल्यास वेगवेगळ्या बायोपिक आणि इतिहासपटांचंही त्यात नाव दिसतं. पण सत्य इतिहास आहे तसा मांडण्याऐवजी या दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा कल वास्तव घडामोडींना सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली अतिरंजित कल्पकतेने मांडण्याकडे दिसून आला. त्यातून बरीचशी राजकीय, सामाजिक आणि पर्यायाने आर्थिक गणितंही साधली गेली.

गेल्या वर्षी अशा धाटणीचे बरेच सिनेमे, वेबसीरिज आल्या आहेत. त्यातल्या काहींना चांगलं यश मिळालं, तर काही दणकून आपटले. त्यातल्या फ्लॉप सिनेमांची यादी करायची झाली तर यशराज फिल्म्सच्या 'सम्राट पृथ्वीराज'चं नाव आधी घ्यावं लागेल. अक्षय कुमारने यात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती. आशुतोष राणा, संजय दत्त, साक्षी तन्वर, सोनू सूद अशी तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा चालला नाही.

त्यानंतर ब्रिटिश सत्तेच्या कालखंडातली गोष्ट घेऊन आलेल्या 'शमशेरा'लाही अपयशाचं तोंड पाहावं लागलं. 2015ला घडलेल्या दोहा-कोची विमान दुर्घटनेवर आधारित 'रनवे 34' हा सिनेमाही फारसा चाललाच नाही. 'झुंड' हा सिनेमा नागपूरच्या विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकावर आधारित होता. पण दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि अभिनेता अमिताभ बच्चन या जोडगोळीची जादू 'झुंड'ला बॉक्स ऑफिसवर टिकवण्यात अपयशी ठरली.

'कौन प्रवीण तांबे', 'शाबाश मिथू' या सिनेमांनाही क्रिकेटधर्मीय भारतात चांगला प्रतिसाद मिळाला नाही. दुसरीकडे जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्या गंगूबाई काठीयावाडी यांच्या जीवनावर आधारित 'गंगूबाई काठीयावाडी' हा आलिया भटची प्रमुख भूमिका असलेला सिनेमा सुपरहिट ठरला. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कहाणी सांगणारा 'द काश्मीर फाईल्स'ही राजकीय वरदहस्ताच्या जोरावर तिकीटबारीवर बराच काळ टिकून राहिला. सत्य घटनांच्या अशा नाट्यमय सिनेरूपांतरांवर भारतीयांनी दाखवलेलं प्रेम ओळखून नेटफ्लिक्सने 'द इंडियन प्रिडेटर' या नावाने डॉक्युसिरीजची एक वेगळी मालिकाच सुरू केली. या मालिकेत नेटफ्लिक्सने भारतात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांना डॉक्युमेंटरी आणि वेबसीरिज अशा स्वरूपात सादर केलंय. या मालिकेतल्या काही प्रसंगांमुळे नेटफ्लिक्स वादाच्या भोवर्‍यातही सापडलं होतं.

एकीकडे बॉलीवूड यशापयशाच्या गर्तेत गटांगळ्या खात असताना, प्रादेशिक सिनेमांनी मात्र वेगवेगळ्या इतिहासपटांच्या आणि बायोपिकच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर वर्चस्व राखण्यात यश मिळवलं. यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा 'आरआरआर' हा तेलुगू सिनेमा. या सिनेमात अल्लुरी सीताराम राजू आणि कुमारम भीम या स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या जीवनातल्या एका कालखंडाचं कल्पकतेने सादरीकरण केलं गेलं होतं.

दिग्दर्शक मणिरत्नमचा बहुप्रतीक्षित तमिळ सिनेमा 'पोन्नियीन सेल्वनप 1'ही याच वर्षी रिलीज झाला. चोल राजवटीवर आधारित असलेल्या या सिनेमाने 500 कोटींहून अधिक कमाई करत तिकीटबारीवर आपलं वर्चस्व राखलं. एप्रिल 2023 मध्ये या सिनेमाचा दुसरा भागही येतोय. अवकाश संशोधक नंबी नारायण यांच्यावर आधारित 'रॉकेट्री' हा तमिळ सिनेमा आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित 'मेजर' या तेलुगू सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कमाई केली.

मराठी सिनेमानेही एकामागोमाग एक अशी शिवकालीन इतिहासपटांची रांगच लावली. त्यामुळे त्यातले काही चांगले चालले तर काहींना संमिश्र प्रतिसाद मिळाला. पावनखिंडीतल्या गाजलेल्या लढाईवर 'पावनखिंड' आणि 'हर हर महादेव' असे दोन सिनेमे यावर्षी येऊन गेले. 'शेर शिवराज है' या सिनेमात अफजलखानाच्या वधाची कहाणी सांगितली होती. यासोबतच शिवरायांच्या आग्रा भेटीवर आधारित 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमाही येऊन गेला.

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव यांच्यावर आधारित 'हंबीरराव' या सिनेमानेही चांगली कमाई केली. शिवसेनेचे ठाण्यातले प्रमुख नेते आनंद दिघे यांच्यावर बनवला गेलेला 'धर्मवीर' हा बायोपिक वेगवेगळ्या कारणांनी गाजला. 'मी वसंतराव' या बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेल्या सिनेमातून शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता.

येणार्‍या वर्षातल्या सिनेमांकडे बारकाईने पाहिलं तर 2022चाच कित्ता पुन्हा एकदा गिरवण्याचा ध्यास भारतीय सिनेजगताने घेतलाय असं दिसतं. राजकारण, क्रीडा, समाज, इतिहास अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण व्यक्तींचा आणि घडामोडींचा आढावा 2023 मध्ये घेतला जाणार आहे. 2023 मधल्या इतिहासपटांच्या आणि बायोपिकच्या गर्दीचा विचार करता, साधारणतः महिन्याला अशा धाटणीचे दोन ते तीन सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान आणि दिवंगत भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित 'मैं अटल हूँ' हा हिंदी बायोपिक मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित करतोय. या बायोपिकमधे अभिनेता पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वादळी कारकिर्दीवर आधारित 'इमर्जन्सी' या सिनेमात अभिनेत्री कंगना राणावत प्रमुख भूमिका साकारणार आहे.

2022 च्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या राजकीय पटावर झालेल्या उलथापालथीत 'धर्मवीर' या सिनेमाने महत्त्वाची भूमिका बजावली. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमाचा सिक्वेल लवकरच येतोय. त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक धक्कादायक खाचखळगे आणि त्यांच्यामागचं गुपित उलगडणार असल्याचा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. या चरित्रपटांच्या निमित्ताने, पडद्याआडचं राजकारण रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.

2021 मध्ये आलेला 'शेरशाह' हा सिनेमा कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा यांच्यावर आधारित होता. ओटीटीवर रिलिज झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे युद्धपटांमधून राष्ट्रभक्तीचा डंका वाजवण्याची जुनीच रीत अजूनही प्रभावी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. याच धर्तीवर यावर्षी आणखी काही बायोपिक येणार आहेत. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'सॅम बहादूर' हा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित असलेला सिनेमा मेघना गुलजार दिग्दर्शित करणार आहेत. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी परमवीर चक्र मिळवणार्‍या लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित 'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदा हा महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 1971ला झालेल्या बांगलादेश मुक्ती संग्राम लढ्यात अतुलनीय कामगिरी करणार्‍या ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्यावर आधारित 'पिप्पा' हा सिनेमाही लवकरच येतोय. या लढ्यात महत्त्वाचं योगदान देणार्‍या रशियन रणगाड्याला भारतीय सैनिकांनी 'पिप्पा' असं नाव दिलं होतं. या सिनेमात अभिनेता ईशान खट्टर मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे.

भारतीय क्रिकेटपटूंमध्ये किलर इन्स्टिन्क्ट जागवण्याचं श्रेय माजी कर्णधार सौरव गांगुलीला जातं. याच 'दादा' खेळाडूचा बायोपिकही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाच्या दिग्दर्शकासोबतच गांगुलीची भूमिका साकारणार्‍या कलाकाराचं नाव अजूनही गुलदस्त्यातच आहे. 'प्यार का पंचनामा' फेम दिग्दर्शक लव रंजन या सिनेमाची निर्मिती करतोय.

भारतीय महिला क्रिकेट टीमची आघाडीची पेस बॉलर झुलन गोस्वामी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेती झाली. तिच्या कारकिर्दीवर आधारित 'चकदाहा एक्स्प्रेस'मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आधुनिक भारतीय फुटबॉलचे जनक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित 'मैदान' हा बायोपिक लवकरच प्रदर्शित होतोय. 'रहीम साब' या नावाने ओळखल्या जाणार्‍या या फुटबॉल प्रशिक्षकाची आणि भारतीय फुटबॉल टीमच्या माजी व्यवस्थापकाची कारकीर्द ही भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ म्हणून ओळखली जाते. रहीम साब यांच्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता अजय देवगण झळकणार आहे.

या वर्षात ऐतिहासिक सिनेमांचीही मोठी लाट उसळणार आहे. यात तानाजी मालुसरेंवर आधारित 'सुभेदार', सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित 'वेडात मराठे वीर दौडले सात', पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानमधल्या मराठ्यांच्या गुलामगिरीवर आधारित 'बलोच', सरसेनापती हंबीरराव मोहितेंवर आधारित 'रावरंभा', छत्रपती ताराराणींवर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' तसेच नागराज मंजुळे – रितेश देशमुख प्रस्तुत शिवत्रयीमधला पहिला भाग 'शिवाजी' असे अनेक मराठी सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने दिल्लीतल्या मुघल राजवटीवर आधारित 'तख्त' या सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात विकी कौशल औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता बॉबी देओलही यावर्षी 'हरी हरा वीरा मल्लू' या तेलुगू सिनेमात औरंगजेबाचं पात्र रंगवताना दिसणार आहे. कुतुबशाहीतल्या एका अनाम वीराची शौर्यगाथा सांगणार्‍या या सिनेमात 'पॉवर स्टार' पवन कल्याण प्रमुख भूमिका साकारणार आहे.

1818 मध्ये लढली गेलेली भीमा-कोरेगावची लढाई महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महत्त्वाची लढाई मानली जाते. या लढाईत महार योद्ध्यांच्या मदतीने इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. पेशवाईत अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीचं लढवय्या स्वरूप या लढाईमुळे समोर आलं. यावर आधारित 'द बॅटल ऑफ भीमा-कोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. या ऐतिहासिक लढाईच्या नायकाची म्हणजेच सिदनाक इनामदाराची भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल साकारतोय. गेल्या काही वर्षांत देशाच्या वैचारिक वर्तुळात गांधी विरुद्ध गोडसे आणि गांधी विरुद्ध सावरकर या राजकीय वादांनी थैमान घातलंय. त्याचे पडसाद वेळोवेळी साहित्यातून, नाटकांमधून उमटलेत. आता पुन्हा मोठ्या पडद्यावरही हा वाद नव्याने जिवंत केला जाणार असून, त्यांच्या निर्मिती आणि तिकीटबारीवरच्या व्यवसायात होणारा राजकीय हस्तक्षेप हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'स्वातंत्र्यवीर सावरकर'मध्ये अभिनेता रणदीप हुडा मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. सप्टेंबर 2022मधे रणदीपने मांजरेकरांच्या ऐवजी आपण हा सिनेमा दिग्दर्शित करणार असल्याचं जाहीर केलंय. 'गांधी गोडसे – एक युद्ध' हा राजकुमार संतोषी दिग्दर्शित सिनेमा या प्रजासत्ताक दिनाला प्रदर्शित होतोय. अभिनेता चिन्मय मांडलेकर या सिनेमात गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे.

राजर्षी शाहू महाराज, साने गुरुजी… महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारी ही दोन नावं. या दोघांनीही महाराष्ट्राचं समाजमन घडवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. 'शाहू छत्रपती' या आगामी बायोपिकमधून राजर्षी शाहू महाराजांचा इतिहास चंदेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या बायोपिकमध्ये अभिनेता ओम भूतकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

असंख्य हालअपेष्टा सहन करून मुंबईची श्रीगौरी सावंत आज ताठ मानेनं समाजात मिरवतेय. तृतीयपंथीयांच्या सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी व्यवस्थेला भिडतेय. तृतीयपंथी बनण्याचा तिचा आजवरचा अतिशय खडतर प्रवास 'ताली' या बायोपिकमधून जगासमोर लवकरच येतोय. या सिनेमात गौरीची भूमिका दिग्गज अभिनेत्री सुश्मिता सेन साकारणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर' या आगामी सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे त्याचे आजोबा पद्मश्री 'महाराष्ट्र शाहीर' कृष्णराव साबळे यांचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणतोय. आपल्या खणखणीत आवाजाने साबळे यांनी महाराष्ट्राचा गौरव, महाराष्ट्राची लोकपरंपरा सातासमुद्रापार नेली. या सिनेमातल्या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी रंग भरणार आहे.

प्रथमेश हळंदे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news