अभिव्यक्त होणे संवेदनशील माणसाचा धर्म

अभिव्यक्त होणे संवेदनशील माणसाचा धर्म

अमळनेर (जळगाव) येथे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवारी सुरू झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांच्या भाषणातील संपादित भाग…

अमळनेरच्या भूमीत 1952 मध्ये तेव्हा ओळखले जाणारे महाराष्ट्र साहित्य संमेलन प्रा. कृ. पा. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. पूज्यनीय साने गुरुजी यांच्या निधनाला केवळ दोन वर्षे झाली होती तेव्हा येथे ते साहित्य संमेलन भरले आता साने गुरुजींचे 125 वे जयंती वर्ष म्हणजे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष गेल्या डिसेंबरपासून सुरू झाले आहे आणि आज अशा पर्वावर या व्यासपीठावर मराठी साहित्याची आपल्या परीने एका सर्जनशील लेखकाला आपण अध्यक्षपदाचा मान दिला. मराठी साहित्य संमेलनाची परंपरा फार मोठी आहे. 1878 पासून सुरू झालेल्या या परंपरेत उत्तुंग प्रतिभेची आणि प्रखर बुद्धिमत्ता असलेली वैचारिक शिखरे म्हणून ओळखली जाणारी मराठी साहित्यातील मोठी व्यक्तिमत्त्वे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर विराजमान होऊन ही साहित्य संमेलनाची परंपरा अधिक देदीप्यमान झालेली आहे. त्यामुळे माझ्यावर या परंपरेचे स्मरण करताना काहीसे दडपण आलेले आहेच. अर्थात, हे दडपण त्यांच्याविषयी असलेल्या भक्तिभावातून, अतीव आदरातून असू शकते, हेही नाकारता येत नाही.

मित्रहो, महाराष्ट्रातील मराठी समाज बांधवांत तीन वेड महत्त्वाचे मानले जातात. त्यातील तिसरे आणि महत्त्वाचे वेड साहित्य संमेलन परंपरा हे होय. साहित्य संमेलने भरवावीत की नाही इथपासून संमेलनासाठी जीवाचे रान करणार्‍या वेड्या माणसांपर्यंत ही परंपरा आपल्यासमोर उभी आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आपल्या पदरी पडणे म्हणजे लेखकीय जीवनातला अंतिम सन्मान अशी धारणा बहुतेकांची असते. माझीही ती आहे. कारण, या निमित्ताने त्या लेखकाला महाराष्ट्रात, मराठी साहित्यप्रेमींमध्ये कमालीचा आदर, प्रेम मिळते, हा माझा अनुभव मी सांगू शकतो. मी अद्याप लिहिता आणि फिरता लेखक आहे. म्हटले तर धावताही लेखक आहे. लोकांमध्ये वावरणे मला आवडते. मी माझ्यापरीने माझी समाजनिष्ठा जपणारा आहे.

ही समाजनिष्ठा जपताना मी समाजातील प्रश्नांना भिडणारा, त्या प्रश्नांना आपल्या लेखनातून मांडू पाहणारा लेखक आहे. प्रत्येकाचे संघर्षाचे, सामाजिक वर्तनाचे, निषेध-स्वीकाराचे मार्ग विविध असू शकतात. मी माझ्या मार्गाची माझ्यापरीने आखणी करणारा लेखक आहे. त्यामुळे मी समाजातील प्रश्न माझ्या लेखनातून, माझ्या स्वरातून आत्मियतेने मांडू पाहतो. बोलणे, अभिव्यक्त होणे, लिहिणे हा प्रत्येक संवेदनशील माणसाचा धर्म असतो. माझाही धर्म हाच आहे. मी लिहितो म्हणजे वाचकांची चार घटका करमणूक व्हावी, असा विचार माझ्या मनात कधीही नसतो. मी माझ्या लेखनाचा विचार करताना समाजाच्या प्रकृतीचा, संरचनेचा, भवतालाचा आणि समकालीन वास्तवाचा अधिक गंभीरपणे विचार करतो. हा विचार करताना मी इथली परंपरा, धार्मिक संरचना, राजकीय व्यवस्था आणि तळागाळातला सर्वसामान्य माणूस हे आणि इतर घटक माझ्या या चिंतनामागे असतात. या घटकांचा पीळ त्या त्या अंगाने विचार करता मला अधिक जाणवतो. अस्वस्थ करतो. हे अस्वस्थ होणे एका सामान्य माणसाचेही असू शकते; पण सर्जनाच्या पातळीवरील हे अस्वस्थपण अधिक ठळक असू शकते.

आजचा एक ज्वलंत प्रश्न आणखी मला भेडसावत आहे. तो म्हणजे मराठी भाषेच्या संबंधातला आणि तरुणांच्या एकूणच भवितव्याविषयीचा. आपण मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून सार्थपणे आग्रही आहोत. तो आपला हक्कही आहे, हे आपण सिद्ध केले आहेच; पण एकीकडे मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी आपण धडपडत असताना मराठी भाषेच्या, मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था काय आहे, असा प्रश्न पडतो. मराठी भाषेसंबंधी जवळजवळ पस्तीस वर्षांपूर्वी बोलताना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणाले होते की, आज मराठी भाषा आपल्या शिरावर राजमुकुट घेऊन आणि अंगावर फाटके वस्त्र पांघरून मंत्रालयाच्या दारात उभी आहे. आज मराठी मंत्रालयात राजभाषा म्हणून प्रस्थापित झालेली असेल; पण तिला मखरात बंद करून किंवा केवळ कागदावर तिचे गोडवे गाऊन ती समाजात उभी राहू शकेल का? शासन मराठी विषयाच्या संबंधाने आदेशावर आदेश काढत असताना मराठीची गळचेपी कोण करतं, हेही तपासून पाहणे गरजेचे झाले आहे.

मराठी माध्यमांच्या शाळा धडाधड बंद पडत आहेत. आजवर सुमारे सोळा हजार मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्याचा आकडा आहे. एकीकडे असे म्हटले जाते की, आजच्या समाजाची मराठी भाषेविषयीची अनास्था वाढीस लागलेली आहे. हेही समजू शकतो; पण मराठी भाषेसाठी, शाळांसाठी कोणते वेगळे प्रयत्न आपण करतो? मध्यंतरी ऐकिवात आले होते की, सरकार मराठी शाळा खासगी संस्थांना चालवायला देणार आहे. आज शिक्षणव्यवस्थेचे भग्न रूप कुणी उभे केले असेल, तर ते या खासगीकरणाने. या खासगीकरणाच्या वर्तुळात सर्वसामान्य, गरीब माणूस कुठे आहे? प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे, हे भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे कलम आहे.

हे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावे हा विचार त्या कलमात अध्याहृत आहे, हे पुन्हा सांगायला नको आणि असे असताना हा विसर आपल्याला का पडला? मराठी ही ज्ञानभाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे आणि तिला ज्ञानभाषा करण्यासाठी सर्वप्रथम शासकीय स्तरावरूनच प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन या व्यासपीठावरून करणे मला गरजेचे वाटते. शाळा- महाविद्यालयात एकांकिका- नाटकांचे प्रयोग बंद झाले आहेत. तिथे पाश्चात्त्य धर्तीवरील कार्यक्रमांची रेलचेल असते. ग्रंथालयांची परिस्थिती आणखी वाईट आहे. याचा संमिश्र परिणाम म्हणून आज मराठी भाषेची, संस्कृतीची पीछेहाट होताना आपल्याला पाहावी लागते. मातृभाषेविषयी प्रेमाची रुजवात मुलांच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news