उजनी जलाशयावर दुर्मीळ ‘बीनहंस’चे प्रथमच आगमन

उजनी जलाशयावर दुर्मीळ ‘बीनहंस’चे प्रथमच आगमन
Published on
Updated on

बेंबळे; सिद्धेश्‍वर शिंदे : स्थलांतरित पक्ष्यांना नंदनवन ठरलेल्या उजनी धरणाच्या जलाशयावर यावर्षी युरोपातून हिवाळी पाहुणा पक्षी म्हणून 'बीनहंस' पहिल्यांदाच येऊन दाखल झाला आहे. अकलूज (जि. सोलापूर) येथील पक्षी निरीक्षक ऋतुराज कुंभार व दिग्विजय देशमुख या वन्यजीव छायाचित्रकारांनी नुकतीच आपल्या कॅमेर्‍यात बीनहंसाची छबी कैद केली आहे.

हंस गणातील कलहंस हे यापूर्वी याठिकाणी अनेक वेळा आल्याची नोंद आहे. मात्र, बीनहंस पक्षी, उजनी निर्मितीनंतर पहिल्यांदाच आला आहे. तो सध्या भिगवणच्या जवळपास पसरलेल्या विस्तीर्ण पाणफुगवट्यावरील उथळ पाण्याच्या ठिकाणी पट्टकदंब हंसांच्या थव्यात विहार करताना दिसतो.

दरवर्षी हिवाळ्यात रशियाजवळच्या युरेशिया, सायबेरिया, मंगोलिया येथून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी व अन्य स्थलांतरित पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होत असतात. पुढे तीन-चार महिने विविध राज्यांतील जलस्थानांवर वास्तव्य करून परत आपल्या मूळ प्रदेशाकडे निघून जातात. या पक्ष्यांच्या संगतीने युरोपातील ब्रिटन, नार्वे, कॅनडा येथील बर्फाच्छादित प्रदेशातील काही टुंन्ड्रा व टायगा हंस पक्षी भरकटत भारतात येतात. त्यातलाच हा प्रकार म्हणजे यावेळी उजनीवर 'बीनहंस' येऊन दाखल झालेला आहे.

बीनहंस पूर्णपणे शाकाहारी असून तो पाण वनस्पतीचे खोड व पाणथळ जवळच्या पिकांची पाने, बिया या खाद्यांवर गुजराण करतो. सुमारे पंचवीस वर्षे आयुर्मान लाभलेला हा हंस सामान्यपणे अडीच ते तीन किलो वजनाचा असतो. उजनीवर कधीकधी भरकटत येणार्‍या कलहंस व बीनहंस यामध्ये बरेच साम्य असते.

बीनहंसाचे वैशिष्ट्ये:

युरोपातील नार्वे व ब्रिटनपासून रशियाच्या युरेशिया भागातील टुंन्ड्रा व टायगा प्रदेशात हे हंस वीण घालतात म्हणून यांना 'टुंन्ड्रा बीनगूज' या नावाने ओळखतात.पाणवठ्यालगतच्या असलेल्या पावटा व वाटाणासारख्या पिकांत यांचा वावर असतो म्हणून 'बीनहंस' हे नाव दिले आहे. हिंदू धर्मात हंसांना मानाचे स्थान आहे. हंस विद्यादेवता सरस्वतीचे वाहन आहे. हंसाची हत्या करणे म्हणजे माता-पिता, देवता व गुरूची हत्या करणे असे मानले जाते.पाणी व दूध वेगळे करणारा हा पक्षी असल्याचे सांगितले जाते.

अतिशय दुर्मिळ हंस उजनीवर पहिल्यांदा आल्याने पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी याठिकाणी गर्दी करीत आहेत. त्याचे छायाचित्र टिपताना व निरीक्षण करताना पर्यटकांनी भरकटत आलेल्या या हंस पक्ष्याला असह्य होईल असे वर्तन करू नये, असे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.

उत्तर युरोपातील ब्रिटन व नार्वे या शीत प्रदेशात वीण घालणारे हे हंस रशियाजवळच्या मंगोलिया, सायबेरिया व युरेशिया व उत्तर एशियातील चीनपर्यंत दरवर्षी स्थलांतर करुन येत असतात. हे पक्षी भारतात तसे येणे दुर्मीळच. मंगोलिया व सायबेरिया येथे मूळ वास्तव्याला असणारे पट्टकदंब हंस, चक्रवाक, धोबी, पाणटिवळे इत्यादी दरवर्षी हिवाळ्यात उजनी परिसरात स्थलांतर करुन येतात.

असा आहे रूबाबदार 'बीनहंस'

इंग्रजीत 'बीनगूज' म्हणून ओळखला जाणारा हा हंस पक्षी स्थानिक बदकांपेक्षा आकाराने मोठा आहे. त्याचे डोके गोलाकार आहे. चोच जड व गडद तपकिरी रंगाची असून त्यावर मध्यभागी नारंगी डाग दिसून येतो. त्याचे पाय नारंगी रंगाचे असून पायांची बोटे पातळ पापुद्य्रांनी जोडलेली असतात. पंख गडद तपकिरी पिसांचे असतात.

भारतात येणार्‍या या हिवाळी स्थलांतरितांसोबत हा बीनहंस भरकटत आला असावा, असा अंदाज आहे. हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आल्याची नोंद असेल.
– डॉ. अरविंद कुंभार ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, अकलूज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news