‘बिद्री’साठी चुरशीने 89.03 टक्के मतदान

‘बिद्री’साठी चुरशीने 89.03 टक्के मतदान

बिद्री, पुढारी वृत्तसेवा : प्रचंड ईर्ष्या, काटाजोड लढती व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 89.03 टक्के मतदान झाले. 56 हजार 91 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बोरवडे, मजरे कासारवाडा, मुरगूड येथे किरकोळ वादावादी वगळता 173 मतदार केंद्रांवर सर्वत्र शांततेत मतदान पार झाले. दोन्ही आघाडीचे 50 उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन व अपक्ष चार अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. मंगळवारी होणार्‍या मतमोजणीतून त्यांचा निकाल स्पष्ट होईल.

सहकारातील बिद्रीची निवडणूक असली तरी यामागील निवडणुकीतून जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाल्याचा इतिहास आहे. याही निवडणुकीत मोठ्या उलथापालथी होत दुरंगी सामना पाहावयास मिळाला. सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू परिवर्तन विकास आघाडी असा सामना रंगला. निवडणुकीत दोन मंत्री, दोन खासदार, दोन आमदार, पाच माजी आमदार, दोन राष्ट्रीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, गोकुळचे अध्यक्ष यांनी एकमेकांच्या विरोधात रान उठविले आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक जोशपूर्ण झाली. मिनी विधानसभेची रंगीत तालीम पहावयास मिळाली.

बिद्रीचे कार्यक्षेत्र कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या चार तालुक्यांत विस्तारल्यामुळे मतदारांच्या सोयीसाठी 173 मतदान केंद्रे उभारली होती. दुपारी बारा वाजेपर्यंत 56 हजार 91 मतदारापैकी 29 हजार 662 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजता मतदान समाप्त झाले तेव्हा 56 हजार 91 मतदारांपैकी 49 हजार 940 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सात गटांतील सात व राखीव गटातील 4 अशा एकूण अकरा सुट्ट्या मतपत्रिका देण्यात आल्या होत्या. सत्ताधारी गटाचे चिन्ह विमान व विरोधी गटाचे कपबशी चिन्ह होते. गट क्रमांक एक, दोन, तीन, चार, सहामध्ये तीन मते देण्याचा अधिकार होता. गट क्रमांक 7 मध्ये एक मताचा तर गट पाचमध्ये चार मते देण्याचा अधिकार होता. राखीव गटात महिला गटात दोन मते, इतर मागास गटात एक, भटक्या-विमुक्त गटात एक व अनुसूचित जाती -जमाती गटात एक मत देण्याचा अधिकार होता. मतदान अधिकारी प्रत्येक गटाच्या मतपत्रिका उभ्या घड्या घालून देत असल्यामुळे मतदारांना काही मिनिटे थांबावे लागत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर चार बूथ उभारल्यामुळे मतदानाचा मोठ्या रांगा न लागता मतदानाला वेग आला होता.

सकाळीच मतदार येऊन गेल्यामुळे काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट जाणवत होता. कसबा वाळवे, बोरवडे, मुरगूड, सरवडे, गारगोटी, सोळांकूर, कडगाव, वाघापूर, मडिलगे, बेलवळे बुद्रुक, बिद्री, निगवे खालसा ही मोठी मतदार संख्या असणार्‍या गावात थोड्याफार मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. मतदान केंद्रास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, आमदार सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अंबरिशसिंह घाटगे, शशिकांत पाटील यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संस्था गटामध्ये कागल तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे प्रतिनिधी म्हणून बिद्री येथील केंद्रावर मतदान केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सोळांकूर येथे मतदान केले.

सायंकाळी चारनंतर मतदान आटोक्यात आल्यामुळे सर्वत्र मतदान केंद्रावर गर्दी कमी झाली होती. सकाळपासून उत्साही असणारे कार्यकर्ते हे बूथमंडपात विसावले होते. मतदार यादीवरून नजर फिरवत मतदानाचे कोणी राहिले आहे का ते पाहात होते. राहिले असल्यास खास गाडी पाठवून मतदानास आणले जात होते. दिवसभर झालेल्या मतदानाची आकडेवारी घेत कुठे वाढणार, कुठे कमी पडणार याबाबतही चर्चा होत होती. ही आकडेवारी नेत्यांपर्यंत पोहोचवली जात होती. मतदान पेट्या रवाना झाल्या अन् कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news