नगर : मनपाचे ग्रामपंचायतीकडे 88 कोटी थकित, पंधरा गावांचा समावेश; दोन पंचायत समित्यांकडे 45 कोटी

नगर : मनपाचे ग्रामपंचायतीकडे 88 कोटी थकित, पंधरा गावांचा समावेश; दोन पंचायत समित्यांकडे 45 कोटी
Published on
Updated on

नगर, पुढारी वृत्तसेवा: दुष्काळी परिस्थितीमध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नगर व पाथर्डी पंचायत समित्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यापोटी मनपाचे पंचायत समित्यांकडे सुमारे त्रेचाळीस कोटींची थकबाकी आहे. तर, पंधरा गावांकडे व्याजासह 88 कोटी 68 लाख 09 हजार 044 रुपयांची थकीत पाणीपट्टी आहे. महापालिकेने मालमत्ताधारकांकडे वसुलीसाठी तगादा लावत असताना दुसरीकडे पाणीपुरवठ्याचे कोट्यवधी रुपये थकले आहेत. वसुलीसाठी मनपाने पाठपुरवा करूनही काहीही उपयोग होत नाही. मनपाच्या वसुलीला ग्रामपंचायतींकडून केराची टोपली दाखविली जात आहे.

महापालिकेच्या पाणी योजनेवरून नगर तालुक्यातील दहा व राहुरी तालुक्यातील पाच गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यातील विळद, शिंगवेनाईक, देहरे, बुरूडगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अन्य गावांचा पाणीपुरवठा थकबाकीपोटी बंद करण्यात आला आहे.

पाणी पुरवठ्याच्या बदल्यात महापालिका संबंधित गावांकडून पाणीपट्टी वसूल करते. याच ग्रामपंचायतींकडे 1 जून 1999 पासून लाखो रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेकडून वारंवार ग्रामपंचायतींना सूचना व नोटिसा दिल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायती त्याला प्रतिसाद देत नाहीत. याबाबत वरिष्ठस्तरावर अनेक वेळा बैठका आयोजित केल्या होत्या. ग्रामपंचायती पाणीपट्टी भरत नसल्याने मध्यंतरीच्या काळात विळद, देहरे, शिंगवेनाईकचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता.

त्या ग्रामपंचायतीने चालू बील भरल्यानंतर पाणीपुरवठ्याचे सुरू करण्यात आला. मात्र, अन्य सात ग्रामपंचायतींचा गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा बंद केला आहे. त्यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. मनपाकडून त्यांना अनेक वेळा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापि त्यांनी पाणीपट्टी भरलेली नाही. दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीत मनपाने टँकरद्वारे नगर व पाथर्डी पंचायत समितीला पाणीपुरवठा केला. या दोन्ही पंचायत समित्यांकडे 45 कोटींची थकबाकी असून, त्यांच्याकडून वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे.

शहरात जप्तीची कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या सूचनेवरून मनपा वसुली पथकाने मालमत्ताधारकांकडे जोरदार वसुली मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. थकबाकी न भरणार्‍या मालमत्ताधारकांच्या घरांना सील लावले जात आहे. दुसरीकडे पाणीपुरवठ्याचे कोट्यवधींची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच आहे. त्यावर मनपा प्रशासन ठोस भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाणीपुरवठा बंद असलेली गावे – वरंवडी व अन्य पाचे गावे (ता. राहुरी), खारेकजुने, हिंगणगाव, शेंडीपोखर्डी, नागरदेवळे, बुर्‍हाणनगर (सर्व ता. नगर). पाणीपुरवठा सुरू असलेली गावे – विळद गवळीवाडा, देहरे, शिंगवेनाईक.

ग्रामपंचायती (कंसात थकबाकी)

नगर तालुका पंचायत समिती – 43,56,96,295, पाथर्डी पंचायत समिती- 2,52,07,605. राहुरी तालुक्यातील वरंवडी व पाचे गावे – 63,95,31,685, नगर तालुक्यातील देहरे – 2,23,32,489, शिंगवेनाईक – 33,38,841, विळद गवळीवाडा- 5802506, खारेकजुने – 70450244, हिंगणगाव – 75917890, शेंडीपोखर्डी – 33095203, नागरदेवळे – 3982929, बुर्‍हाणनगर – 32332942, बुरूडगाव – 24315.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news