छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गुगल मॅप लोकेशनमधील गोंधळामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीच्या प्राथमिक परीक्षेपासून रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी देशभरात नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत सामान्य अध्ययनाचा पेपर; तर दुपारच्या सत्रात अडीच ते साडेचार या वेळेत सीसॅटचा पेपर पार पडला. छत्रपती संभाजीनगरात एकूण 25 केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यातून अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात दाखल झाले आहेत. शहरात येणार्या काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र शोधण्यासाठी गुगल मॅपची मदत घेतली. मात्र, विवेकानंद महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाबत काही विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. यातील काही विद्यार्थी जालना, बीड येथून आले होते.
नेमके काय घडले?
समर्थनगर या शहराच्या मध्यवर्ती भागातील हे महाविद्यालय गुगल मॅपवर शहरापासून 15 किमी दूर वाळूज, वडगाव कोल्हाटी भागात दिसून आले. गुगल मॅपनुसार हे विद्यार्थी तिथे पोहोचले. तिथे गेल्यावर हा पत्ता चुकीचा असल्याचे त्यांना आढळून आले. तेथून पुन्हा हे विद्यार्थी समर्थनगर भागात पोहोचले. तोपर्यंत 9 वाजून गेले होते. परीक्षा केंद्रात दाखल होण्यासाठी 9 ची वेळ देण्यात आली होती. ती उलटून गेल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. यातील काहीजणांना केवळ दोन-तीन मिनिटांचा उशीर झाला होता. विनंती करूनही त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकला नाही. सुमारे 50 विद्यार्थ्यांना याचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले.
अन्य पर्यायही तपासणे आवश्यक
यूपीएससीच्या परीक्षेचे नियम कडक असतात. त्यामुळे वेळेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही. विद्यार्थ्यांनी गुगल मॅपवर अवलंबून न राहता अन्य पर्यायांचाही विचार करावा, जेणेकरून त्यांची परीक्षा बुडणार नाही, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया
यूपीएससीच्या नियमाप्रमाणे प्रीलिमची परीक्षा हुकल्यानंतर थेट पुढच्या वर्षीच परीक्षा देण्याची तरतूद आहे. आता गुगल मॅपमुळे गोंधळ उडून परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले आहे.