मुख्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’ मराठ्यांचा कार्यक्रम करतात : मनोज जरांगे

मनोज जरांगे
मनोज जरांगे

जालना; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडींनी नवीन षड्यंत्र रचले की काय, असा सवाल करीत ओएसडी आमच्याशी हसतखेळत बोलतात आणि मराठ्यांचा कार्यक्रम करतात, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी बुधवारी केला.

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत. तेथे नवीन मसुदा बनवून आमच्या काही लोकांना बळीचा बकरा बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कोणाच्या गाड्या वापरल्या जातात, याची माहिती आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत, त्यांचे ओएसडी मात्र त्यांच्या जातीकडून लढत आहेत. हसतखेळत गोड बोलतात; पण मराठ्यांचा कार्यक्रम लावतात. त्या ओएसडींनी मराठ्यांच्या अन्नात तेल ओतू नये, येत्या काही दिवसांतच सगळे काही बाहेर येईल, असा इशारा जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस हे आमचे शूत्र नाहीत; पण आरक्षणाच्या विरोधात बोललेले आपण खपवून घेणार नाही, आमच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

मंत्र्यांशी चर्चेनंतर सलाईन लावले

अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसांपासून जरांगे उपोषण करीत आहेत. मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्य मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांना फोन लावून दिला. त्या मंत्र्यांशी मनोज जरांगे यांचे आश्वासक बोलणे झाल्यावर जरांगे यांनी रात्री अडीच वाजता वैद्यकीय उपचारांसह सहमती दर्शवली व सलाईन लावून घेतले. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी बोलताना योग्यवेळी संबंधित मंत्र्यांचे नाव जाहीर करू, असे सांगितले.

पाटील, भुजबळांवर टीका

जरांगे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. दहापैकी आठ मागण्या मान्य झाल्यास ते आंदोलन यशस्वी होते, या पाटील यांच्या वक्तव्यावर कोणत्या मागण्या मान्य झाल्या हे त्यांनी दाखवावे, असे आव्हान जरांगे यांनी दिले. जरांगेंच्या मागण्या हनुमानाच्या शेपटीसारख्या वाढतच आहेत, या भुजबळ यांच्या विधानावर बोलताना 'ते बधिर आहेत, त्यांना काय कळतं, यांच्यामुळे ओबीसी अडचणीत आले आहेत,' असा आरोप जरांगे यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news