बिलोली (नांदेड) : पुढारी वृत्तसेवा – बिलोली येथील जिल्हा न्यायधीश-१ तथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बिलोली व्ही. ब. बोहरा यांनी आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड (वय ५० वर्षे, रा. अजनी, ता. बिलोली, जि. नांदेड) याला कलम ३७६ (२) (N), भा.दं. वि. आणि कलम ४, ६, १० पोक्सो. अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड रु. २५ हजार आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा आणि कलम ५०६ भा. दं. वि. अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु. ५ हजार व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
घटनेबाबतचे वृत्त असे की, यातील पीडित मुलीच्या आईचे लहानपणी निधन झाल्यामुळे आणि वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे मामाच्या गावी अजनी (ता. बिलोली) येथे आजी-आजोबा आणि मामासोबत राहत होती. माहे ऑक्टोबर २०२० मध्ये पीडितेची मावशी बाळंतपणासाठी माहेरी आजनी येथे आली. दि. २८/११/२०२० रोजी पीडित मुलीची मावशीच्या पोटात दुखत असल्याने पीडितेचे आजी-आजोबा, मामा यांनी पीडितेच्या मावशीला लोहगाव येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले.
१/१२/२०२० रोजी दुपारी पीडितेचे मामा पीडितेला शेताकडे जाऊन जनावरांना चारा पाणी कर असे सांगून तोदेखील दवाखान्यात लोहगाव येथे गेला. त्यामुळे पीडित मुलगी मामाच्या सांगण्यावरून शेताकडे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेली असता. पीडित मुलीच्या आजी आजोबांच्या शेताच्या बाजूला बांधाला लागून चुलत आजोबा यादव बंडाभोई बट्टलवाड यांचे शेत होते. शेतात यादव बट्टलवाड हजर होता.
पीडित मुलगी एकटी पाहून आरोपी यादव बट्टलवाड याने आजी आजोबा कुठे आहेत, असे विचारले. त्यावर पीडित मुलीने अजी आजोबा आणि मामा लोहगाव येथे मावशी बाळंतीण झाली त्यामुळे दवाखान्यात गेलेत, असे सांगितले. तेव्हा आरोपी यादव बंडाभोई बट्टलवाड याने पीडित मुलीचे तोंड दाबून अत्याचार केला. पुढील महिनाभर शेतात कोणी नसल्याचे पाहून कोणाला सांगिल्यास मारुन टाकतो अशी धमकी देत अत्याचार रेला. त्यामुळे पीडित मुलीने घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही. त्यानंतर चार पाच महिन्यांनी पीडित मुलीचे पोट वाढल्याने आजी आजोबा विचारल्यावर घडलेली हकीकत पीडित मुलीने अजी आजोबा यांना सांगितली. त्यावरुन दि. २८/७/२०२१ रोजी पोलीस स्टेशन बिलोली येथे आरोपी विरुद्ध तक्रार दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कलम ३७६(२)(N), ५०६ भा. द. वि. आणि कलम ४, ६, १० पोक्सो. नुसार पो. स्टे. बिलोली येथे गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन दोषारोप पत्र अतिरिक्त सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.
या गुन्ह्यामध्ये सरकारतर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करून तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी ६/६/२०२४ रोजी वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे ॲड. संदीप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात पो. उपनिरीक्षक संनगले यांनी तपास पूर्ण केला. तसेच पैरावी अधिकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल एम. ए. शेख (ब. न. 1870) पोलिस स्टेशन बिलोली यांनी सहकार्य केले.