परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याबद्दल एका युवकाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी परळीतील युवकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक निकालानंतर गणेश हरिभाऊ सावंत (रा. गणेशपार, परळी शहर) या युवकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली. संशयीत आरोपीने फेसबुकवर एक एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात काही कार्यकर्ते नाचत असताना दिसतात. या व्हिडिओसह त्याने पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर देखील पोस्ट केल्याचे समोर आले. हा व्हिडिओअ व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी केली आणि युवकावर गुन्हा दाखल करून तत्काळ त्याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी संशयीत आरोपीविरुद्ध पोलीस कर्मचारी विष्णू उद्धवराव फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सामाजिक सलोखा बिघडवणे, तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने कृती केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात कलम १५३ अ, ५०५ (२), भादविसह कलम ६७ आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर, पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याची कृती करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे सोशल मीडियातून व्यक्त होताना नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत. सर्वांनी शांतता, सामाजिक सलोखा राखावा.
– संजय लोहकरे (परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक)