वाशिम (अजय ढवळे) : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून वशिम शहरात प्रवेश करणाऱ्या एका स्कूल बसमध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली़. या माहितीच्या आधारावर नाकाबंदी करून स्कूल बसची तपासणी केली असता, त्यामध्ये दहा लाख रूपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा आढळून आला़. ही घटना २७ मे रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली़. या प्रकरणी पोलीसांनी बस चालकाविरूध्द गुन्हा नोंदविला़ आहे.
राज्यभरात गुटखा बंदी असल्याने गुटखा विक्रीमधून अमाप संपत्ती जमा करण्याचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे़. दरम्यान, मालेगावहुन वाशिमच्या दिशेने पिवळ्या रंगाची एक स्कूल बस येत असुन त्यामध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वाशिम शहर पोलीसांना २७ मे रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास मिळाली़. या माहितीच्या आधारावर मालेगाव मार्गावरील वाटाने लॉन जवळ पोलीसांनी बॅरिकेट्स टाकुन नाका बंदी केली़. या नाकाबंदी दरम्यान संशयीत असलेली स्कूल बस त्या ठिकाणी तपासासाठी थांबविली़. स्कूल बस मध्ये जाऊन तपासणी केली असता प्रत्येक सिटखाली पांढऱ्या रंगाचे प्लास्टीक पोते व खाकी रंगाचे काही बॉक्स आढळून आले़.
या पोत्यात व बॉक्समध्ये प्रतिबंधीत गुटखा आढळुन आला़ ज्याची बाजारात किंमत १० लाख १८ हजार ८५० रूपये एवढी आहे़. यासह दहा लाख रूपये किंमतीची स्कूल बसही जप्त करण्यात आली़. असा एकूण वीस लाख १८ हजार ८५० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़. या प्रकरणी वाशिम पोलीसांनी बस चालक सलमान खान रऊफ खान पठाण (३२) (रा़ मेडशी ता़ मालेगाव जि़ वाशिम) याच्या विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला़ आहे.
गुटखा नेमका येतो तरी कोठून ?
वाशिम शहरामध्ये गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये येतो आहे. त्यावर रोख बसवण्यासाठी उपाय योजले जात नाही का, अशी चर्चा नेहमीच होत असते़. बंदी असूनही गुटखा कुठल्या माध्यमातून येतो हा कळीचा मुद्दा आहे़. मुळावरच हातोडा घातला तर मोठ्या प्रमाणात होत असलेली गुटख्याची विक्री थांबू शकते, असेही बोलले जात आहे. काही विक्रेत्यांविरुद्ध कारवाई होऊनही पुन्हा त्यांच्याकडूनच गुटखा पकडला जातो़. ही वस्तुस्थिती आहे़. त्यावर जरब बसण्याची गरज आहे. गुटखा जप्तीच्या कारवाई झाल्यानंतर तो गुटखा कोणत्या निर्मात्याने विकला त्याच्यापर्यंत पोलीस पोहचत नाहीत़ ही खेदाची बाब आहे़.
हेही वाचा :