नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आम्ही या निवडणुकीला हुकूमशाही विरोधात लोकशाहीच्या दृष्टीने महत्व देत आहोत. ही निवडणूक शेवटची ठरू नये, याची आम्हाला चिंता आहे, अशी भीती राष्ट्रवादी- काँग्रेसचे नेते खा. शरद पवार यांनी रविवारी (दि.२१) व्यक्त केली. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमर काळे यांच्या प्रचारार्थ वरुड येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
देशाचे अनेक पंतप्रधान मी पाहिलेत. आतापर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले, त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. मी या १० वर्षात नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान पाहिले आहेत. जे एकही आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या सरकारच्या काळातचं जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढले, लोकांना संसार चालविणे कठीण झाले आहे. १० वर्ष तुमचं सरकार आहे, आणि आम्हाला विचारता काय केलं, असे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले, देशात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. आमच्या काळात असे अत्याचार झाले नव्हते. मणिपूरला आम्ही शिष्टमंडळ पाठवलं, तेव्हा असं कळलं की, त्यांच्या घरावर हल्ले झाले, अत्याचार झाले तरी सरकारने त्यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. राज्यात सध्या शेतकरी वर्ग संकटात आहे, त्यामुळे आता परिवर्तन घडविण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, अमर काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा :