Lok Sabha Election 2024 – नागपूर ५४.११, रामटेक ६१ टक्के मतदान; कमी टक्का कुणाला धक्का! | पुढारी

Lok Sabha Election 2024 - नागपूर ५४.११, रामटेक ६१ टक्के मतदान; कमी टक्का कुणाला धक्का!

नागपूर : पुढारी वृत्तसेवा – राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांमध्ये शुक्रवारी १९ एप्रिल रोजी शांततेत मतदान पार पडले. एकूण पाच मतदार संघात सायंकाळी सरासरी ६०.२२ टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघात ५४.११ टक्के तर रामटेक लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाल्याची अंतिम आकडेवारी आता जाहीर झाली आहे. रामटेकला मतदान ३ टक्के वाढले असताना नागपुरातील कमी मतांचा टक्का कुणाला धक्का देणार, यावर आता पोल मॅनेजर्स, राजकीय विश्लेषकांची गणिते सुरू झाली आहेत.

नागपुरातील लढत भाजपचे हेविवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे अशी थेट असली तरी निर्णायक क्षणी बसपाचे योगेश लांजेवार यांच्या मतांवरही असल्याची चर्चा सुरू आहे. हत्ती काँग्रेसच्या हाताचे गणित बिघडवणार तर नाही ना, असेही बोलले जात आहे. यापूर्वीच्या गडकरींच्या विजयात बसपाचे मोहन गायकवाड (९६ हजार) तर आपच्या अंजली दमानिया (७४ हजार) यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यावेळी वंचित, आप काँग्रेसचे विकास ठाकरे यांना फायदेशीर असले तरी मतदानाचा टक्का ७५ टक्क्यापर्यंत नेण्यात गडकरी समर्थक, ठाकरे समर्थक अपयशी ठरल्याने नेमका फायदा कुठे, कुणाला? याविषयी अनिश्चितता आहे.

भाजपला पूर्व विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक मताधिक्य देईल असे बोलले जाते. पश्चिम, दक्षिण पश्चिम आणि दक्षिण विधानसभामध्ये ५०-५० असे समीकरण मतदानाच्यावेळी फिरताना प्रत्यक्षात दिसले. दुसरीकडे उत्तर आणि मध्य नागपूर विधानसभामध्ये काँग्रेसला हलबा, मुस्लिम, दलित मतांचे विभाजन अशा बदलत्या समीकरणात मताधिक्य मिळेल, अशी आशा असताना याच भागात मतदानाचा न वाढलेला टक्का गडकरी यांना फायदेशीर ठरू शकतो, असे बोलले जाते. काँग्रेस, मविआची यंत्रणा कडक उन्हात मतदान टक्का वाढविण्यात कमी पडली असे दिसले दुसरीकडे आमच्या लोकांची नावे यादीत नव्हती. उत्तरमध्ये मतदान जाणीवपूर्वक स्लो करण्यात आल्याचा ठपका काँग्रेस नेते, पदाधिकारी करताना दिसले.

यात काहीसा बदल अपेक्षित असल्याने उद्याच अंतिम आकडेवारी पुढे येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे –

रामटेक ५८.५० टक्के

नागपूर ५३.७१ टक्के

भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के

गडचिरोली- चिमूर ६७.१७ टक्के

चंद्रपूर- ६०.०३ टक्के

Back to top button