Lok Sabha Election 2024 : गडचिरोली जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्तात मतदान | पुढारी

Lok Sabha Election 2024 : गडचिरोली जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्तात मतदान

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज गडचिरोली जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्तात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजतापर्यंतच मतदानाची मुदत असल्याने आणि कडक उन्ह असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. (Lok Sabha Election 2024 ) गडचिरोली येथे प्रशासनातर्फे निवडक नवमतदार, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांची रथावरुन वाजतगाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. मतदान केंद्रावर आलेले वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना पोलिसांनीही मदत केली. (Lok Sabha Election 2024 )

राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांनी आपापल्या गावातील मतदान केंद्रांवर मतदान केले. जिल्हाधिकारी संजय दैने, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनीही गडचिरोलीत मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी ९ वाजतापर्यंत लोकसभा मतदारसंघात ८.९९ टक्के मतदान झाले होते.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा येथे अहेरी येथून आज पोलिस विभागाच्या हेलिकॉप्टरने ३ अतिरिक्त ईव्हीएम मशिन पाठविण्यात आल्या. वेळेवर तांत्रिक बिघाड झाल्यास खबदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले..

कुरखेडा येथील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे दुसरी मशिन आणण्यात आली. पुढे दोन तासांनंतर मतदान पूर्ववत सुरु झाले.

Back to top button