निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गृहकलहाला उधाण! | पुढारी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गृहकलहाला उधाण!

सुनील कदम

राज्याच्या राजकारणावर काही प्रमुख घराण्यांचा वर्षानुवर्षे दबदबा आहे, तर अलीकडील काळात राजकारणात काही नवीन घराण्यांची भर पडलेली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख घराण्यांच्या फोडाफोडीचा खेळ जोमात असून, संबंधित घराण्यांमधील गृहकलह शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे.

पवारांच्या बुरुजाला भगदाड!

बारामतीचे शरद पवार घराणे म्हणजे राज्याच्या राजकारणातील एक अतिबलदंड घराणे! स्वत: शरद पवार यांनी जवळपास पन्नास वर्षे राज्याच्या राजकारणातील आपले स्थान अबाधित ठेवले आहे, अगदी काल-परवापर्यंत राज्याचे राजकारण पवारांच्या घराण्याभोवतीच फिरत होते. शरद पवार आणि अजित पवार यांना वगळून कोणत्याच पक्षाला राज्यातील राजकारणाचा विचारही करता येत नव्हता. मात्र, अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी फारकत घेताच पवारांच्या अभेद्य बुरुजाला भलेमोठे भगदाड पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काका-पुतण्याच्या फारकतीनंतर कार्यकर्त्यांची विभागणी तर झालेलीच आहे, पण पवार घराण्याच्या नात्यातही दिवसेंदिवस उभी दरी रुंदावताना दिसत आहे. पवार घराण्यातील काही नातेवाईक शरद पवारांची तर काही नातेवाईक अजित पवारांची तळी उचलताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजयी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने ठाकल्यामुळे तर ही दरी दिवसेंदिवस अधिकच रुंदावताना दिसत आहे. पवार घराण्यातील हा गृहकलह भविष्यात राज्याच्या राजकारणावर कोणता प्रभाव पाडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

निंबाळकर-मोहिते-पाटील!

माढा लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून निंबाळकर विरुद्ध मोहिते-पाटील या दोन तगड्या घराण्यांमध्ये संघर्ष उभा राहिल्याचे दिसत आहे. माढा मतदार संघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना दुसर्‍यांदा उमेदवार जाहीर केली आहे. मात्र, रणजितसिंहांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांच्याकडून पहिला विरोध दर्शविला गेला. रामराजेंनी रणजितसिंहांच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे धैर्यशील मोहिते-पाटील यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटलांसह त्यांचे समर्थकही कमालीचे नाराज असल्याचे दिसत आहेत. नुकतीच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शरद पवारांची भेट घेऊन माढ्यातून तुतारी फुंकण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे इथला गृहकलह वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाकरे-ठाकरे संघर्ष!

राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वेगळी चूल मांडल्यापासून राज आणि उद्धव या ठाकरे बंधूमधून कधी विस्तवही आडवा जात नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यभर झंझावाती दौरे काढून भाजप आणि शिंदे शिवसेनेवर कडाडून हल्ले चढविण्यास सुरुवात केली आहे. याला शह देण्यासाठी भाजपने आणि शिंदेसेनेने राज ठाकरे यांना आपल्या तंबूत ओढण्यासाठी आटापिटा चालविला होता. मात्र, राज ठाकरे यांनी कुणाच्याही तंबूत डेरेदाखल होण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त राहून भाजप आणि नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, राज जरी भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले नसले, तरी प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर ठाकरे विरुद्ध ठाकरे अशा प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसण्याची शक्यता दिसून येत आहे.

मुंडे विरुद्ध मुंडे!

बीडमधील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. पण बदलत्या राजकीय समीकरणात आता अजित पवार गटात असलेले धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांचा प्रचार करावा लागणार आहे. मात्र, बीड जिल्ह्याच्या राजकारणावर भविष्यात कुणाचे वर्चस्व असणार, हे या निवडणूक निकालाने अधोरेखित होणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सहजासहजी पंकजा मुंडे यांची वाट सोपी करून देण्याची शक्यता नाही. त्यामुळे इथला मुंडे विरुद्ध मुंडे हा परंपरागत संघर्ष सध्या सुप्तावस्थेत दिसत असला, तरी आतील अंगाने वेगळ्याच झळा धगधगताना दिसल्यास नवल वाटू नये.

कीर्तीकर पिता-पुत्र!

उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघात कीर्तीकर पिता-पुत्रांमध्ये कडवा संघर्ष उभा राहिल्याचे दिसत आहे. या ठिकाणी ठाकरे शिवसेनेने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर शिंदे शिवसेनेने अमोल कीर्तीकरांचे वडील आणि एकेकाळचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांचे आव्हान त्यांच्यासमोर उभा करण्याची सिद्धता केली आहे. त्यामुळे ही लढत अवघ्या महाराष्ट्रात अतिशय लक्षवेधी ठरू शकते.

जानकर काका-पुतण्या!

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि त्यांचे पुतणे स्वरूप जानकर यांच्यामध्येही अलीकडे बिनसल्याचे दिसत आहे. जानकर घराण्यातील अन्य कुणी राजकारणात उतरणार नाही, अशी घोषणा महादेव जानकर यांनी करताच त्याला स्वरूप जानकर यांनी उघड आव्हान दिले आहे. भाजपने जानकरांना परभणीची जागा बहाल केली आहे, तर स्वरूप जानकर माढ्यातून दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत.

जैसी करणी, वैसी भरणी..!

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा पाया भक्कम होताच त्यांनी राज्यातील परंपरागत आणि प्रस्थापित राजकीय घराणी मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. वसंतदादा पाटील यांचे घराणे फोडताना त्यांनी प्रकाशबापू आणि विष्णूअण्णा-मदन पाटील यांच्यात फूट पाडून विष्णूअण्णांना आपल्या कळपात ओढले. राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे डोईजड होऊ लागताच त्यांनी मुंडे घराण्यात फूट पाडली. मुंडे घराणे भेदताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध पंडितअण्णा आणि धनंजय मुंडे यांना आपल्या बाजूने वळवून त्यांचा वापर केला. त्यावेळी गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, ज्या पद्धतीने आज तुम्ही आमच्या घराण्यात फूट पाडली, तशीच वेळ उद्या तुमच्या घराण्यावरही आल्याशिवाय राहणार नाही. स्व. मुंडे यांचे ते शब्द आज सत्यात उतरलेले दिसतात. विजयसिंह मोहिते-पाटील आणि प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यातही पवारांनी फूट पाडून ठेवली. सातारच्या भोसले घराण्यातील अभयसिंहराजे भोसले यांना आपल्या बाजूने खेचून घेतले. अशा पद्धतीने राज्यातील विविध घराण्यांना पवारांच्या या राजकीय कुटनीतीचा सामना करावा लागला. आता पवारांच्या घराण्यातच उभी फूट पडून पवार घराणे दुभंगले आहे. ‘जैसी करणी, वैसी भरणी’ हे आज पवार घराण्याच्या वाट्याला आल्याचे दिसत आहे.

Back to top button