मनसेचा भोंगा महायुतीला लाभदायक

file photo
file photo

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला, तरी लोकसभा निवडणुकीत ते स्वतः आणि त्यांची पक्ष संघटना नेमकी कोणती भूमिका वठवणार, यावर बरेचसे राजकारण अवलंबून आहे. मतदानाच्या आकडेवारीत इंजिनाचा टक्का छोटा असला तरी त्यांच्या भोंग्याचा आवाज मोठा आहे. महायुतीला सध्या या भोंग्याचीच अधिक गरज आहे. मनसेच्या पाठिंब्याने आठ-दहा लोकसभा मतदार संघांत 40-50 हजार मतांचा लाभ महायुतीला होईलच; मात्र त्यापेक्षा अधिक लाभ हा मोदींच्या खंबीर नेतृत्वाच्या बाजूने राज ठाकरे काय बोलतात किंवा उद्धव ठाकरेंसह विरोधी बाजूने होणार्‍या टीकेला जे उत्तर देतात, त्यातून होणारी वातावरणनिर्मिती अधिक परिणामकारक ठरणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील सर्व 48 जागांवर होणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत मनसेने कोणताही उमेदवार दिला नाही. तरीही 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरे यांनी जो सभांचा धडाका लावला, त्याने तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 'नरेटिव्ह'ची गरज भागवली. राज यांच्या माध्यमातून तयार झालेल्या वातावरणाचा लाभ आघाडीला लोकसभा आणि विधानसभेतही झाला. सध्या राज्यात 45 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीला वातावरण आपल्या बाजूने फिरविणार्‍या राजकीय भाष्यकाराची अधिक गरज आहे. ती गरज राज यांच्या माध्यमातून आपसूक भरून निघते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज नरेंद्र मोदींवर जी टीका करत आहेत, ती व्यक्तिगत स्वार्थापायी करत आहेत. मुख्यमंत्री आणि सत्तापद गेले, पक्ष गेला म्हणून होणारी व्यक्तिगत टीका आहे, असे सांगत राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातच आपली चुणूक दाखविली आहे. मुंबईतील उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा क्षेत्रात एकूण 1 लाख 23 हजार, दक्षिण मध्यमध्ये 96 हजार 498, मुंबई उत्तर मतदार संघात 68 हजार 244, उत्तर मध्य येथे 68 हजार 313 मते मिळाली, तर उत्तर पश्चिम 65 हजार आणि दक्षिण मधला टक्का 41 हजारांच्या घरातील आहे. राज्यभरात मनसेच्या प्रभावक्षेत्रात सरासरी किमान 40 ते 50 हजार मते मनसेमुळे फिरण्याची शक्यता आहे.

पकपक केलीत तर खबरदार

नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करतानाच राज ठाकरे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. जास्त पकपक केलीत तर माझे तोंड आहेच, असा इशारा राज यांनी देऊन ठेवला.

आकडेवारीचा विचार केल्यास महाराष्ट्रातील किमान दहा मतदार संघांत मनसेच्या पाठिंब्याचा थेट फायदा महायुतीला होणार आहे. मुंबईतील सहा जागांसोबतच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीच्या उमेदवारांना थेट लाभ होऊ शकतो; मात्र त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मनसेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना सोबत घेण्याचे कसब दाखवावे लागणार आहे. त्यावर मनसेचा मतदार महायुतीकडे किती प्रमाणात वळणार, याचे गणित अवलंबून आहे. मनसेने मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईत 25 जागा लढविल्या. या 25 जागांवरील मनसेची एकूण मते 4.62 लाख इतकी होती, तर राज्यभरात मनसेची मते साडेबारा लाखांच्या घरात होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news