सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे सुमारे 47 हजार 377 हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील एकूण फळबागांच्या तुलनेत 55 टक्के हिस्सा डाळिंबाचा आहे. त्यामुळे डाळिंबाचे भौगोलिक पाहणीनुसार शेतकर्याच्या बांधावर जाऊन नोंदणी करून क्षेत्रफळासह जीआय मानांकन होणार आहे. यासाठी जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने बुधवारी (दि. 1) विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.
ते म्हणाले, जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, माढा या भागात डाळिंबाच्या पिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांचे अर्थकारण या फळबांगावर आवलंबून आहे.
शिंदे म्हणाले, खोड कीड आणि तेलकट डाग यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत असून यामधून शेतकर्यांच्या बागांचा बचाव व्हावा. कीड लागण्यापूर्वी तसेच तेल्या पडण्यापूर्वीच शेतकर्यांना योग्य कृषी सल्ला मिळावा. शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळता यावे तसेच त्यांना वेळेवर कृषी सल्ला मिळावा, हा यामागे हेतू आहे. त्याअंतर्गत व्यवस्थापन व भौगोलिक मानांकन नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्यांनी नोंदणी करावी.
यासाठी शासनाच्या कृषी विभाग, आत्मा, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन कंपन्या तसेच शेतकरी मित्र यांच्या सहभागाने जिल्ह्यातील डाळिंब बागांची भौगोलिक नोंदणी होणार आहे.
त्यासाठी जिल्ह्यात शेतकर्यांनी संबंधितकृषी सहाय्यकांकडे संपर्क साधवा तसेच आपल्या डाळिंब बागाची नोंदणी करुन घ्यावी. त्यासाठी सात/बारा उतारा आणि बागेचा नकाशा जोडून द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
शेतकर्यांना याचा मोठा
फायदा होईल ः शिंदे
बाळासाहेब शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील डाळिंब बागांचे भौगोलिक पाहणीनुसार मानांकन करण्यासाठी बुधवारी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी सहभागी झाल्यास त्यांच्या बागांची नोंद शासनदरबारी होणार आहे. त्यांना कृषी सल्ला, विविध प्रकारची माहिती पुरविली जाणार आहे. डाळिंबाच्या मार्केटिंगसाठी या जीआय मानांकनाचा मोठा फायदा शेतकर्यांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्यांनी यामध्ये सहभागी व्हावे.