येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंजाबमधील राजकीय कॅनव्हास चौरंगी लढतींमुळे अधिक लक्षवेधी बनला आहे. या सीमावर्ती राज्यातील तेरा जागांसाठी प्रथमच भाजप, अकाली दल, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे मतदारांसमोर चार पर्याय उपलब्ध झाले आहेत. सध्या या राज्यात आम आदमी पक्षाची राजवट असून भगवंत मान यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे. सत्तेवर आल्यापासून त्यांना या सीमावर्ती राज्यात फारशी चमक दाखविता आलेली नाही. उलट, ते सतत कसल्या ना कसल्या वादाच्या भोवर्यात अडकत गेल्याचे दिसून येते. यावेळी आम आदमी पक्षाने सर्वात आधी लोकसभेच्या जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले.
राज्यात सत्ता सांभाळल्यापासून राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांवर 'आप'ने प्रचारात भर दिला आहे. आमची लढत काँग्रेसशी असल्याचे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले असले, तरी भाजप आणि अकाली दल हेही या दोन्ही पक्षांना जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. या राज्यात एक जून रोजी गुरुदासपूर, अमृतसर, खडूर साहिब, जालंधर, होशियारपूर, नंदपूर साहिब, लुधियाना, फतेहगड साहिब, फरिदकोट, फिरोजाबाद, भटिंडा, संगरूर आणि पतियाळा या तेरा जागांवर मतदान होणार आहे.
पंजाबमध्ये भाजप स्वबळावर लढवणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या मते काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अकाली दल यांच्याशी थेट लढत देऊन महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपली ओळख वाढवण्यावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबमधील जनता आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर भाजपने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेले काम सर्वांसमोर आहे. गेल्या दहा वर्षांत शेतमालाची खरेदी किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) करण्यात आली आहे, याकडे जाखड यांनी लक्ष वेधले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे युतीबाबत अकाली दलाशी चर्चा करत होते. मात्र, अकाली दलाने ताठर भूमिका घेतल्यामुळे युतीचा मार्ग बंद झाला. दुसरीकडे, स्वतःला प्रबळ विरोधक म्हणून सादर करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. आमची लढत आम आदमी पक्षाशी होणार असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत. त्यात किती तथ्य आहे, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. विशेष म्हणजे या राज्यात उमेदवारांच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये नेहमीसारखा घोळ सुरू झाला आहे.
1996 मध्ये अकाली दल आणि भाजप यांच्यातील युती 2020 मध्ये तुटली. त्यानंतर अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत हातमिळवणी केली. त्याचा दोन्ही पक्षांना काडीमात्र फायदा झाला नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे आठ जागा जिंकल्या होत्या. शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांना प्रत्येकी दोन, तर भाजपला एक जागा मिळाली होती. 2019 लोकसभेत अकाली दलाचा मतांचा वाटा 27.8 टक्के होता. तो उत्तरोत्तर घसरत चालला आहे. भाजपने मात्र आपली मतपेढी सुरक्षित राखल्याचे दिसून येते.
पंजाबमध्ये काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांना आलटून-पालटून सत्ता मिळत राहिली हा इतिहास असला, तरी आता या राज्यात आम आदमी पक्षाने भक्कमपणे पाय रोवल्याचे दिसून येते. आपली मतपेढी वाढविणे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा जिंकणे, हे लक्ष्य भाजपने येथे निर्धारित केले आहे. यावेळी भाजपला तीन ते चार जागा मिळाल्या, तरी ती पक्षासाठी स्वागतार्ह घटना ठरेल. भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार या पक्षाला ग्रामीण पंजाबमधून पाठिंबा मिळत चालला आहे, त्यामुळे हे नेते खुशीत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेले देशभरातील सुमारे 400 राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक आयोगाने अपक्षांसाठी 190 मुक्तचिन्हे निवडली आहेत. मागील निवडणुकीवेळी ही संख्या 193 होती. निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांसाठी प्रसारित केलेल्या चिन्हांमध्ये चॉकलेट, बूट, पाकीट, नरसाळे आदी चिन्हांचा समावेश आहे.