गोंदिया : अश्वासनाची पूर्तता केली नसल्याने गावकऱ्यांनी भाजप उमेदवाराला प्रचारापासून रोखले | पुढारी

गोंदिया : अश्वासनाची पूर्तता केली नसल्याने गावकऱ्यांनी भाजप उमेदवाराला प्रचारापासून रोखले

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुक प्रचारासाठी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोडदे करड या गावात आलेले भाजप उमेदवार व विद्यमान खासदार सुनील मेंढेंना गावकऱ्यांनी गावात प्रचार करण्यापासून रोखल्याने गदारोळ झाला. शेतीला १२ तास वीज पुरवठा करण्याच्या आश्वासनाची पुर्तता केली नसल्याने गावकरी आक्रमक झाले होते. त्यामुळे खा. मेंढेंना प्रचार नकरताच आल्यापावलीच माघारी परतावे लागल्याची घटना ५ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. येत्या १९ एप्रिल रोजी विदर्भात लोकसभेतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजपच्या वतीने खासदार सुनील मेंढे पुन्हा एकदा मैदानात आहेत. शुक्रवारी ते दिवसभर अर्जुनी मोरगाव तालुक्यात प्रचार दौऱ्यावर होते. अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे करड येथे ते प्रचारासाठी आले असता दिलेल्या आश्वासनानुसार कृषी पंपांना १२ तास वीजपुरवठा का नाही? या प्रश्नाला घेऊन गावकऱ्यांनी गदारोळ करत मेंढे यांना एक शब्दही बोलू न देता प्रचारासाठी मज्जाव केला. या घटनेवरून गावकऱ्यांचा आक्रोश आणि संताप पाहता पुन्हा एकदा सुनील मेंढेची निष्क्रियता व जनतेशी झालेला दुरावा चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात खरीप व उन्हाळी रब्बी दोन्ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. त्यासाठी तालुक्यात सिंचनासह विजेची सुविधा आवश्यक आहे. मात्र, राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना १२ तास वीज पुरवठा करण्याची हमी दिल्यानंतर केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. तेव्हा शेतकर्‍यांच्या मागणीनुसार १२ तास वीज पुरवठा करण्यात येईल. असे आश्वासन खा. मेंढे यांच्यासह केंद्र व राज्यातील सरकारने शेतकर्‍यांना दिले होते.

दरम्यान, मधल्या काळात १२ तास वीजपुरवठा करण्यात आला. मात्र, लगेच ५ दिवसांत पुन्हा ८ तासच वीज पुरवठा करून शेतकर्‍यांची बोळवण केली जात आहे. तर अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे प्रकारही वाढले आहे. विशेषतः आठ तासात शेतकरी शेतीला सिंचन करून पिकांचे उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराने संतापलेल्या शेतकऱ्यांनी गावात प्रचारासाठी आलेल्या खा. सुनील मेंढेना प्रचार करण्यापासून रोखत कृषी पंपाच्या वीज समस्येला घेऊन प्रचंड गदारोळ केला व प्रचाराशिवाय गावातून परतून लावले. ही घटना काहींनी आपल्या मोबाइलच्या कॅमेर्‍यात कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button