देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. गेल्या सात दशकांमध्ये 17 लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये सर्वाधिक 9 वेळा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर पाच वेळा भाजप सत्तेवर आले. याशिवाय काँग्रेस (आर), जनता दल, जनता पार्टीने एक-एकदा सत्ता मिळवली आहे.
1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवाराचे नाव असलेल्या मतपेटीत विशिष्ट चकचकीत कागदाचा तुकडा टाकून मत नोंदवण्याची पद्धत होती. यामध्येही काहींनी गैरप्रकार केलेच! काही उमेदवारांचे प्रतिनिधी मतदान केंद्राच्या बाहेर उभे राहत आणि मतदारांना सांगत की, मतपत्रिका पेटीत टाकण्याऐवजी आमच्याकडे द्या, आम्ही तुम्हाला त्याबदली एक रुपयाची नोट देऊ. त्या काळात एक रुपयाची किंमतही मोठीच होती.(तेव्हा रुपयाला शेर-दीडशेर ज्वारी मिळे. राईस प्लेट सहा आणे, आठ आण्याला असे) त्यामुळे अनेक मतदार त्या प्रलोभनाला बळी पडत. त्यांच्याकडील मतदानाच्या कागदाचे तुकडे गोळा करून उमेदवाराचाच एखादा माणूस आत जाऊन संबंधित उमेदवाराच्या पेटीत सगळा गठ्ठा टाकत असे!