Lok Sabha Election 2024 | उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काय आहेत आवश्यक तरतुदी? घ्या जाणून.. | पुढारी

Lok Sabha Election 2024 | उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काय आहेत आवश्यक तरतुदी? घ्या जाणून..

नाशिक :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून 16 मार्च 2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी उमेदवारांना 26 एप्रिल ते 3 मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्र सादर करतांना पुढील तरतुदींचे पालन करणे आवश्यक असल्याबाबत उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये माहिती दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) दाखल करण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. त्याचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असावे आणि त्याचे नाव महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीत असावे. संबंधित लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे उमेदवार स्वत: किंवा सूचकामार्फत उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. (Lok Sabha Election 2024)

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नामनिर्देशन पत्र विहित नमुना ” 2A” भरायचा असून त्यासोबत शपथपत्र नमुना 26 प्रथम वर्ग दंडाधिकारी / नोटरी यांचे समक्ष स्वाक्षरी करून सादर करावा लागतो. शपथपत्र नमुना-26 मधील सर्व रकाने भरणे आवश्यक असून एखादी बाब लागू नसेल तर ”निरंक”/”लागू नाही” असा तपशील नोंदविणे आवश्यक आहे. असे न केल्यास नामनिर्देशन पत्र छाननीचे वेळी अवैध ठरविले जाऊ शकते. नामनिर्देशन पत्र सादर करतांना उमेदवारास शपथ/ दृढकथन करावे लागते. (Lok Sabha Election 2024)

नामनिर्देशनपत्रासोबत जमा करावयाची अनामत रक्कम सर्वसाधारण प्रवर्गासाठी रूपये 25,000/-, अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारासाठी रूपये 12,500 /- याप्रमाणे आहे. अनामत रक्कम रोख स्वरूपात उमेदवारी अर्ज सादर करताना अदा करणे आवश्यक असते.

एक उमेदवार जास्तीत जास्त 4 नामनिर्देशन पत्र सादर करू शकतो. एक उमेदवार दोनापेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही. उमेदवारास राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक तर अपक्ष असल्यास एकूण 10 सूचक आवश्यक. राजकीय पक्षांचे उमेदवार यांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचना पत्र (AA & BB) नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी 3.00 वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक असते.

फौजदारी प्रकरणे दाखल असणाऱ्या उमेदवारांनी याबाबत वृत्तपत्र आणि टेलिव्हिजन चॅनेलवर प्रचाराच्या कालावधीमध्ये 3 वेळा विहित नमुन्यात प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांच्या बाबतीत त्यांच्या राजकीय पक्षाने देखील एका वर्तमानपत्रामध्ये व सोशल मिडीयावर माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे.

उमेदवारांनी साधारणत: तीन महिन्यांच्या आतील कालावधीत काढलेला फोटो निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे नामनिर्देशन पत्रासोबत किंवा जास्तीत जास्त छाननीच्या वेळेपूर्वी द्यावयाचा आहे. फोटोचा आकार आणि फोटो कसा असावा यासाठी देखील आयोगाच्या मार्गदर्शक तरतुदी आहेत.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 चे कलम 76 अन्वये निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्‍या उमेदवारांना दैनंदिन खर्चाचा हिशोब सादर करण्याच्या तरतुदी लागू आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी निवड़णूक आयोगाचे मार्गदर्शक तरतुदी किंवा निर्देश पहावेत, असे ही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (स्त्रोत – निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक) 

हेही वाचा :

Back to top button